मदतीचा नवा फंडा! जुन्नरमध्ये कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी दिली चक्क स्वतःची स्कॉर्पिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 12:23 PM2021-05-21T12:23:06+5:302021-05-21T12:23:27+5:30
सोमतवाडी येथील आदिवासी नेते देवराम लांडे यांचा पुढाकार, इंधन व चालकाचा खर्चही लांडे करणार
जुन्नर: कोरोनाच्या संकटात सामाजिक बांधिलकी जपत असंख्य व्यक्ती मदतीसाठी उभे राहत आहेत. काही जण गरजूना अन्नवाटप करत आहेत. तर अनेकांकडून आर्थिक साहाय्य केले जात आहे. अशाच कठीण काळात जुन्नर तालुक्यातील सोमतवाडी येथील आदिवासी नेते देवराम लांडे यांनी कोरोना रुग्णांना मदत करण्याचा नवा मार्ग काढला आहे. त्यांनी रुग्णांच्या प्रवासासाठी चक्क स्वतःची स्कॉर्पिओ गाडी दिली आहे.
गाडीचा इंधन आणि चालकाचा खर्च ते स्वतः करणार असून जोपर्यंत कोरोना हद्दपार होत नाही. तोपर्यंत गाडी रुग्णसेवेत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राजकिय टिका टिपण्णी, लक्षवेधी सामाजिक आंदोलने यामुळे लांडे हे नेहमीच चर्चेत असतात. आक्रमक व ग्रामीण भाषाशैलीमुळे त्यांच्या कर्तृत्वाची नवी ओळख निर्माण झाली आहे.
त्यांनी स्वतःची वापरती गाडी सोमतवाडी कोरोना केअर सेंटरला कोरोना रुग्णांना आणण्यासाठी व बरे झाल्यावर घरी सोडण्यासाठी दिली आहे. आदीवासी भागातील प्रत्येक कुटुंब हे माझी जबाबदारी या भावनेतून ही गाडी दिलीआहे. कर्ज काढण्याची वेळ आली तरी रुग्णसेवा खंडीत होऊ देणार नसल्याचे लांडे यांनी सांगितले आहे.