स्वतः शेण खाऊन समाजाला वेठीस धरण्याची नवी पद्धत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:13 AM2021-02-26T04:13:47+5:302021-02-26T04:13:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात ज्या १२ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत, त्या ऐकून पोलिसांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात ज्या १२ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत, त्या ऐकून पोलिसांनी सुमाेटो गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे. पोलिसांनी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. स्वतः शेण खायचं आणि समाजाला वेठीस धरायचे ही नवी पद्धत सुरु झाल्याचीही टीका त्यांनी केली.
पूजा चव्हाण हिचा मृत्यू झाला, त्या ठिकाणाला चित्रा वाघ यांनी गुरुवारी (दि. २५) भेट दिली. त्यानंतर त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात जाऊन तेथील पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन तपासाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
वाघ म्हणाल्या की, पूजा चव्हाण हिने ज्या इमारतीतील फ्लॅटमधून खाली उडी मारली, तो फ्लॅट सील असल्याने त्याच्यावरील फ्लॅटमध्ये जाऊन पाहणी केली. हा प्रकार रात्री १ च्या सुमारास घडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास १०० नंबरला याची संपूर्ण माहिती देण्यात आली. ही माहिती राठोडकडून घेण्यात आली होती. पोलिसांनी ही माहिती जाहीर करावी. पूजाचा मृत्यू झाल्यापासून ते सकाळी सातपर्यंत अरुण राठोड याच्या मोबाईलवर कोणाकोणाचे फोन आले, त्यांची चौकशी करावी, अशी मागणी वाघ यांनी केली.
वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्यावर टीकेची झोड उठविली. त्यांनी काहीही माहिती दिली नसल्याचे वाघ यांनी सांगितले. सर्व माहिती दिल्यानंतरही पुणे पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नसल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. हे लक्षात घेऊन हा तपास आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपवा, अशी मागणीही त्यांनी केली.
चौकट
‘गोरगरिबांच्या मुली मेल्या तरी चालतील’
“मंत्री वाचला पाहिजे, राज्यातील गोरगरिबांच्या मुली मेल्या तरी चालतील,” असे म्हणत सरकारच्या धोरणावर चित्रा वाघ यांनी टीका केली. मुख्यमंत्री संवेदनशील आहेत, ते यावर योग्य निर्णय घेतील असे अजूनही वाटते, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्य महिला आयोगाला अध्यक्ष नाही. राष्ट्रीय महिला आयोगाला अहवाल पाठवला. वनमंत्री संजय राठोड यांच्या चौकशीशिवाय अहवाल पूर्णच होऊ शकत नाही. त्यामुळे या अहवालाला अर्थ नाही, असे त्या म्हणाल्या.
चौकट
चित्रा वाघ म्हणतात
* सरकारमधल्या तीनही पक्षांचे नेते बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी हिरीरीने पुढे येत आहेत. भंडाऱ्यात बालके जळून गेली तेव्हा ही एकी दिसली नाही.
* ज्या डॉक्टरांचा वार नव्हता, तो का आला? त्याने पूजाला ट्रीटमेंट का दिली? पुणे पोलिसांनी कोणतीही मदत मागितली नाही. तपास केला, निघून गेले आणि बरोबर दुसऱ्या दिवशी डॉक्टरची आई आजारी पडावी, अरुणच्या घरी चोरी व्हावी केवढे योगायोग आहेत.
* पोलिसांकडून न्याय मिळाला नाही तर न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार.
* पोहरादेवी कार्यक्रमानंतर अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह झाले.