शिक्षकांना जुंपले नव्या कामास
By admin | Published: July 6, 2017 03:05 AM2017-07-06T03:05:50+5:302017-07-06T03:05:50+5:30
पाच सप्टेंबर २०१३च्या शिक्षक दिनापासून सुरुवातीला चार शिक्षकांची व नंतर गेल्या वर्षी आणखी सात शिक्षकांची देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
देहूरोड : पाच सप्टेंबर २०१३च्या शिक्षक दिनापासून सुरुवातीला चार शिक्षकांची व नंतर गेल्या वर्षी आणखी सात शिक्षकांची देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या जकात नाक्यांवर बदली केली होती. त्यानंतर ३० जून २०१७ अखेर जकात नाक्यांवर ‘इमाने इतबारे’ काम करणाऱ्या शिक्षकांना जकात नाके बंद होताच मंगळवारपासून (दि. ४ जुलै) ‘मुकी बिचारी कुणीही हाका’ या उक्तीप्रमाणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासनाने चक्क बोर्डाच्या हद्दीतील सातही वॉर्डांतील कुटुंबांकडील शौचालये सुविधा आहे का , कुटुंबातील सदस्य संख्या किती, सार्वजनिक शौचालये वापरणाऱ्यांची संख्या किती, तसेच सार्वजनिक शौचालये उपलब्ध नसल्यास उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या याबाबत सविस्तर सर्वेक्षण करण्यासाठी चक्क ११ शिक्षकांची नियुक्ती करण्याचा प्रकार समोर
आला आहे.
रक्षा संपदा विभागाच्या दिल्ली येथील महासंचालनालयाकडून देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील सातही वॉर्डांत बोर्डाकडून उपलब्ध करण्यात आलेली सार्वजनिक शौचालये, वैयक्तिक (खासगी) शौचालये यांची संख्या, तसेच त्यावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांची संख्या आणि उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांची संख्या यांची निश्चित आकडेवारी गोळा करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून सोमवारी संबंधित सर्वेक्षण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून, वॉर्ड क्रमांक एकमध्ये समाविष्ट असणाऱ्या कोटेश्वरवाडी येथून या सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून, अकरा शिक्षक व तसेच जकात नाके बंद झाले असल्याने कारकून व शिपाई असे एकूण सतरा कर्मचारी सर्वेक्षण करीत आहेत.
वास्तविक ‘बालकांचा मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009’ मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शिक्षकांना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रतिनियुक्तीवर अगर तात्पुरत्या स्वरूपात अन्यत्र वर्ग करू नये. शिक्षकांना दशवार्षिक जनगणना, नैसर्गिक आपत्ती कार्य, निवडणूक प्रक्रियेशी संबधित कामे सोडून इतर शाळाबाह्य कामे देण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्याची पायमल्ली होत आहे.
‘असे होतेय शौचालयविषयक सर्वेक्षण’
1शौचालय सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्येक घरी जाऊन शिक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांनी मिळकतीत राहणाऱ्यांचे नाव, पत्ता, कुटुंबातील सदस्य संख्या, शौचालय आहे का?, नसल्यास सार्वजनिक शौचालयाचा पर्याय आहे का? उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या यांची माहिती घेण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शिक्षकांनी सर्वेक्षण करणाऱ्या भागात नागरिक व व्यापाऱ्यांनी, दुकानदारांनी प्लॅस्टिकचा वापर टाळणे, वापरास बंदीबाबत माहिती देणे जनजागृती करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
2सर्वेक्षणात प्रामुख्याने झोपडपट्टी भागात सेफ्टी टँक नसताना शौचालये असल्याने काही भागात नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने त्याचेही सर्वेक्षण करण्यात येणार आहे. बोर्डाच्या हद्दीतील मिळकतींत असणारी शौचालयांची संख्या व त्यावर तसेच सार्वजनिक शौचालयांवर अवलंबून असणाऱ्या सदस्यांची संख्या निश्चित झाल्यानंतर उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांची निश्चित संख्या उपलब्ध होणार आहे. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या निश्चित झाल्यानंतर कॅन्टोन्मेंटकडून संबंधित भागात ‘बायो टॉयलेट’ उपलब्ध करण्याबाबत दिल्लीतील रक्षा संपदा महासंचालनालयाकडून निर्देश देण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांची सांगितले आहे.
खासगी शिक्षण संस्थांचे साम्राज्य वाढत चालले आहे. कॅन्टोन्मेंट शाळेचा दर्जा घसरत असल्याची तक्रार केली जात आहे. अनेक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे. तरीही कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून शिक्षकांना जकातीच्या कामावर जुंपले होते. जकातनाके बंद झाल्यानंतर त्यांच्या हातात खडू येईल, असे वाटत होते. परंतु, बोर्डाने त्यांना स्वच्छतागृहाचे सर्व्हेक्षण करण्याचे काम काम दिले आहे. त्यामुळे आणखी काही दिवस गुरुजींना शाळा मिळणे कठीण झाले आहेत.
शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी गुरुजींकडे पुन्हा अध्ययनाचे काम द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
दृष्टिक्षेपात आकडेवारी
देहूरोडची लोकसंख्या : 48962 ( 2011 च्या जनगणनेनुसार)
सार्वजनिक शौचालये संख्या (आसन क्षमता) 450
दर 24 माणसांमागे 1 शौचालय असणे गरजेचे .
लष्करी लोकसंख्या सुमारे पाच हजार.
जनगणनेनंतर गेल्या सहा वर्षात वाढलेली लोकसंख्या अंदाजे - सहा ते सात हजार.