दुसऱ्या चाचणीसाठी उजाडणार नवीन वर्ष?
By admin | Published: November 10, 2015 01:53 AM2015-11-10T01:53:19+5:302015-11-10T01:53:19+5:30
राज्यात पहिले सत्र संपून दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या, तरी अद्याप शाळांमध्ये नैदानिक चाचण्यांतर्गत घेण्यात येणाऱ्या दुसऱ्या चाचणीसाठीची ई-टेंडरिंगची प्रक्रियाच सुरू झालेली नाही
पुणे : राज्यात पहिले सत्र संपून दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या, तरी अद्याप शाळांमध्ये नैदानिक चाचण्यांतर्गत घेण्यात येणाऱ्या दुसऱ्या चाचणीसाठीची ई-टेंडरिंगची प्रक्रियाच सुरू झालेली नाही. यामुळे या चाचणीसाठी नवे वर्षच उजाडणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याअंतर्गत जुलैमध्ये अपेक्षित असणारी चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून ७ आॅक्टोबरपर्यंत घेण्यात आली. पहिलीच चाचणी लांबल्याने आॅक्टोबरमध्ये अपेक्षित असणारी दुसरी चाचणी लांबणीवर पडली. त्यामुळे दुसऱ्या चाचणीला अधिक उशीर न करता ती डिसेंबरमध्ये घेतली जाणार असल्याची चर्चा सुरू होती. या चाचणीसाठी त्रयस्थ संस्थेद्वारे चाचण्या घेण्यात येणार आहेत. यासाठी एससीईआरटीने इच्छुकांची नावे मागवली होती. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद न लाभल्याने ई-टेंडरिंग करून संस्थांची निवड केली जाणार होती.
महिन्यात घेण्यात आली, तर दुसरी चाचणी आॅक्टोबरमध्ये अपेक्षित असली, तरीही शिक्षण विभागाने पहिल्याच चाचणीला लावलेला विलंब पाहता ही चाचणी डिसेंबरमध्ये होणार, अशी चर्चा सुरू आहे. राज्यातील ४ हजार २०० शाळांमध्ये त्रयस्थ संस्थेद्वारे चाचण्या घेण्यात येणार आहे. यामध्ये कोणत्या त्रयस्थ संस्था भाग घेण्यास उत्सुक आहेत, हे पाहण्यासाठी परिषदेने यापूर्वी इच्छुकांची नावे मागविली होती. मात्र, आता या संस्थांसाठी ई-टेंडरिंग केले जाणार आहे व त्यानंतर संस्थांची निवड करून परीक्षा घेतली जाणार आहे.
दरम्यान, नोव्हेंबरमध्ये टेंडर काढल्यानंतर २१ दिवसांचा कालावधी संस्थांना द्यावा लागणार आहे. त्यानंतर आलेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया तसेच परीक्षा पद्धती या सर्व गोष्टीसाठी १५ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. त्याचबरोबर दुसऱ्या चाचणीसाठी प्रश्नपत्रिका तयार करण्याचेही काम परिषदेकडेच आहे. त्यामुळे इतक्या कमी दिवसांत हे काम होऊन डिसेंबरमध्ये तरी दुसरी चाचणी होईल का? याबाबत शंका आहे.