महाविद्यालये सुरू करण्यास नवीन वर्ष उजाडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:27 AM2020-11-26T04:27:01+5:302020-11-26T04:27:01+5:30
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे आठ महिन्यांपासून बंद असलेली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये येत्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या ...
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे आठ महिन्यांपासून बंद असलेली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये येत्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यास संलग्न शैक्षणिक संस्थांच्या संचालकांनी व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी अनुकुलता दर्शविली आहे.मात्र, पालकांची चर्चा करूनच महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत. त्यामुळे पुणे,अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू होणार नवीन वर्ष उजाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्न महाविद्यालये सुरू करण्याबाबत सकारात्मकता दर्शविली होती. विद्यापीठातर्फे संलग्न महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी चर्चा करून महाविद्यालय सुरू करण्याबाबत मंगळवारी निर्णय घेतला जाणार होता. त्यानुसार व्यावसायिक व व्यावसायिक महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधला. त्यात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
डॉ. नितीन करमळकर म्हणाले, मंगळवारी सकाळी अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए , एमसीए, आर्किटेक्चर आदी शैक्षणिक संस्थांच्या संचालकांची तर दुपारी पारंपरिक महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी चर्चा केली. सर्वांनी महाविद्यालय सुरू करण्याबाबत अनुकूलता दाखविली. तसेच ऑनलाइन शिक्षणामधील मर्यादांचा मुद्दा या बैठकीत उपस्थित केला. परंतु,कोरोनाची दुसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात एकूण परिस्थितीचा अंदाज घेतला जाईल. त्यानंतर सर्व पालकांशी चर्चा करून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महाविद्यालय सुरू करावीत, अशी भूमिका सर्वांनी मांडली.
नाशिक जिल्ह्यात येत्या ४ जानेवारी पर्यंत कोणत्याही गोष्टी सुरू करू नयेत असा निर्णय पालकमंत्र्यांनी घेतला आहे. त्याच बरोबर पुणे शहरातील नाही शाळा १३ डिसेंबर पर्यंत सुरू न करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने जाहीर केला. त्यामुळे जानेवारी महिन्यात महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय उचित ठरेल, आशी चर्चा शिक्षण वर्तुळ केली जात आहे.