मध्यरात्री भरपावसात रस्त्यावर नवजात 'नकोशी'ला वाऱ्यावर सोडलं; ग्रामस्थांनी 'माणुसकी'चं दर्शन घडवत जगवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 04:30 PM2021-08-13T16:30:13+5:302021-08-13T16:34:11+5:30
आजही समाजातील संकुचित वृत्तीचे माणसं मुलींच्या जन्मांतर तिचा आनंदाने स्वीकार करताना दिसत नाही
पाईट : प्रगतीची एक एक शिखर सर करत असताना देखील समाजातील स्त्री- पुरुष समानतेबद्दल अद्यापही जागरूकता नसल्याचे वारंवार अनेक घटनांनी समोर येत आहे. आजही समाजातील संकुचित वृत्तीचे माणसं मुलींच्या जन्मांतर तिचा आनंदाने स्वीकार करताना दिसत नाही. 'नकोशी'ला निर्दयीपणे वाऱ्यावर सोडून दिल्याच्या घटना घडताना पाहायला मिळतात. अशीच एक धक्कादायक घटना खेड तालुक्यातील कोये येथे घडली आहे. एका जन्मानंतर काहीच स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळून आले आहे. रडण्याच्या आवाजाने सादर धक्कादायक घटना उघडकीस आली. रात्रीच्या सुमारास स्त्री जातीच्या नवजात अर्भकाला भरपावसात रस्त्यावर सोडून गेले असल्याचा संशय परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे .
कोये (ता. खेड) येथे रात्री ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास कोणीतरी स्त्री जातीचे नवजात अर्भक सोडून गेले. ज्या अर्भकाच्या रडण्याच्या आवाजाने सादर घटना प्रथम उषाबाई हिरामण राळे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी पोलीस पाटील साहेबराव राळे यांना कळविली.
यानंतर पोलीस पाटील राळे व ग्रामस्थ मानद राळे, उपसरपंच सागर राळे ,गोविंद राळे ,पोपट राळे गुरुजी यांनी हे अर्भक पाईट प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. नवजात अर्भक चार तासांपूर्वी जन्माला आले असल्याचा अंदाज आरोग्य अधिकारी अश्विनी कांबळे यांनी वर्तविला असून त्याचे वजन ३ किलो असल्याचे सांगितले. याबाबत पोलीस पाटील साहेबराव राळे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.