मानवतेला कलंक .! दोन नवजात शिशुंना सोडले कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 02:52 PM2020-01-14T14:52:32+5:302020-01-14T14:55:13+5:30
माणसाने अपत्य रस्त्यावर सोडली असली तरी पहाटेच्या दरम्यान कुत्र्यांनी या दोन मुलांचे संरक्षण केले.
पुणे: पाषाण तलाव परिसरातील गेटच्या समोर असलेल्या झाडीमध्ये अज्ञात व्यक्तींनी एक दिवसाच्या मुलगा व मुलगी दोन लहान मुलांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर मंगळवारी पहाटेच्या दरम्यान सोडून गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
विशेष बाब म्हणजे या घटनेमध्ये माणसाच्या कृत्याने आपली अपत्य रस्त्यावर सोडली असली तरी पहाटेच्या दरम्यान या परिसरातील कुत्र्यांनी मात्र या दोन मुलांचे संरक्षण केले. या परिसरात असलेल्या भटकी कुत्री व अन्य प्राणी यांना या कुत्र्यांनीजवळ येऊ दिले नाही. कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज व माणसाच्या मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्याने रस्त्यावर फिरण्यासाठी आलेल्या शहानवाज शेख त्यांच्या मुले सोडून दिल्याचा प्रकार लक्षात आल्यावर त्याने जवळच असलेल्या कामगारांच्या मदतीने मुलांना कामगारांच्या वस्ती वर सुरक्षित ठिकाणी हलवले .
ज्या वस्तीमधील महिलांनी मुलांना स्वच्छ करत आपल्याकडे असलेल्या ब्लँकेट च्या साह्याने गुंडाळून ठेवले.
पोलिसांना पाचारण केले यानंतर पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी व पोलिसांनी शासनाच्या अँम्बुलन्स ला बोलवत मुले दवाखान्यात पाठवली.
पाषाण तलाव परिसराच्या जवळ महामार्गालगत लहान मुले टाकण्याचे प्रकार वारंवार घडले आहेत. या परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत अशी मागणी केली जात आहे.