नव्याने निर्माण झालेल्या नगरपालिका व नगरपंचायतींचे डीपी फक्त जीपीएस प्रणालीद्वारेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:08 PM2019-01-30T12:08:33+5:302019-01-30T12:14:43+5:30
नव्याने निर्माण झालेल्या नगरपालिकांचे व नगरपंचायतीचे विकास आराखडे यापुढील काळात केवळ भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे (जीआयएस) तयार केले जाणार आहेत.
पुणे: राज्यात नव्याने निर्माण झालेल्या नगरपालिकांचे व नगरपंचायतीचे विकास आराखडे (डीपी) यापुढील काळात केवळ भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे (जीआयएस) तयार केले जाणार आहेत,अशी माहिती राज्याच्या नगररचना विभागाचे संचालक नो. र. शेंडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.त्याचप्रमाणे यापुढील काळात सर्व महापालिका व इतर नियोजन प्राधिकरणांचे डीपी जीपीएस प्रणालीद्वारे तयार केले जावेत,अशा स्पष्ट सूचनाही शासनाने दिल्या आहेत.
राज्याच्या नगर रचना विभागाच्या 105 व्या वर्धापन दिनामित्ताने मुंबई येथे विविध उपक्रमांचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे केले जाणार आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शेंडे बोलत होते. नगररचना विभागाने वर्धा, भंडारा, धुळे, नंदूरबार, उस्मानाबाद, परभणी, बीड, यवतमाळ, जालना यासह ठाणे, कोल्हापूर, सातारा, लातूर आणि नांदेडच्या प्रदेशासाठीच्या १७ प्रादेशिक योजना (आरपी)वर्षभारात पूर्ण करण्याची कामगिरी केली. त्यामुळे नव्याने स्थापन १३६ नगरपंचायती आणि ५५ नगरपालिकांचे डीपी पुढील दोन वर्षांमध्ये द्रतगती स्वरूपात तयार करण्याचे आदेश शासनाने दिल्याचे शेंडे यांनी सांगितले.
जीआयएसच्या माध्यमातून विकास आराखडा तयार करताना उपलब्ध होणा-या माहितीचा साठा (डेटा) भविष्यात सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभाग, महसूल आणि इतर विभागांना वापरता येऊ शकतो,असे नमूद करून शेंडे म्हणाले,जीपीएस प्रणालीचा उपयोग करून नगरपंचायती व नगरपालिकांचे आराखडे निर्धारित वेळेत तयार केले जातील.त्याचप्रमाणे नागरिकांना राज्यातील मंजूर विकास आराखड्याचे भाग नकाशे (पार्ट प्लॅन) घेण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा नगररचना कार्यालयाकडे अर्ज करावा लागत होता.परंतु,पुढील काही दिवसांत नागरिकांना भाग नकाशे ऑनलाइन पध्दतीने उपलब्ध करून दिले जाणार आहेत.