पोलीस शिपायाच्या अंगावर घातली मोटार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 02:36 AM2018-08-13T02:36:47+5:302018-08-13T02:36:57+5:30
वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांनी वाहतूक परवाना मागत काळ्या काचांबाबत विचारणा केल्याच्या रागातून दोन महिला आणि एका पुरुषाने त्यांना शिवीगाळ करत त्यांच्याशी धक्काबुक्की केली.
पुणे - वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांनी वाहतूक परवाना मागत काळ्या काचांबाबत विचारणा केल्याच्या रागातून दोन महिला आणि एका पुरुषाने त्यांना शिवीगाळ करत त्यांच्याशी धक्काबुक्की केली. त्यानंतर एका पोलीस शिपायाच्या अंगावरच मोटार घालत धडक देऊन त्यांना जखमी करून ते तेथून पळून गेले़ ही घटना कोरेगाव पार्क जंक्शन ते मोरओढा चौक रस्त्यावर शनिवारी सायंकाळी सहा वाजता घडली़
याप्रकरणी पोलीस शिपाई पांडुरंग पवार यांनी फिर्याद दिली असून, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दोन महिलांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : पांडुरंग पवार तसेच त्यांचे सहकारी के. जे. पावसकर व शागिर्द शेख हे कोरेगाव पार्क वाहतूक विभागात कार्यरत आहेत. शनिवारी सायंकाळी ते कोरेगाव पार्क जंक्शन ते मोरओढा चौक या दरम्यान वाहतूक नियमन करत असताना एक मोटार तेथे आली.
मोटारीच्या चालकाकडे पवार यांनी परवाना मागून मोटारीला असलेल्या काळ्या काचांबाबत विचारणा केली. त्या वेळी चालकाने पोलिसांशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली. तसेच, मोटारीमध्ये असलेल्या महिलांनी पोलीस शिपाई शेख यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून जात त्यांचा शर्ट ओढला.
त्यानंतर तिघेही मोटारीमध्ये बसले आणि ती सुरू करून शेख यांना धडक देऊन तेथून निघून गेले. त्यात पोलीस शिपाई शेख हे जखमी झाले आहेत. कोरेगाव पार्क पोलीस अधिक तपास करीत आहेत़