पुणे आकाशवाणीतील वृत्त विभाग सुरू राहणार; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी निर्णयाला दिली स्थगिती
By श्रीकिशन काळे | Published: June 15, 2023 07:18 PM2023-06-15T19:18:44+5:302023-06-15T19:20:06+5:30
आता पुणेकरांना आकाशवाणीवरून ठळक बातम्या ऐकता येणार आहेत...
पुणे : पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद करून तो छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. परंतु, या निर्णयाला जोरदार विरोध झाला. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत पुणे वृत्त विभागातूनच काम होणार असल्याचा आदेश प्रसार भारतीचे सहाय्यक संचालक पी. पवन यांनी दिले आहेत. त्यामुळे पुणेकरांना आकाशवाणीवरून ठळक बातम्या ऐकता येणार आहेत.
पुणे आकाशवाणी वरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे युनिट छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्याचा निर्णयाला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्थगिती दिली आहे. त्यानंतर पी. पवन यांनी लेखी पत्र काढले आहे. खासदार प्रकाश जावडेकर यांनी ठाकूर यांच्याशी संपर्क साधून या संदर्भात चर्चा केली होती. तसेच प्रसार भारतीचे अपूर्व चंद्र आणि मुख्य कार्यकारी अधिकारी द्विवेदी यांच्याशीही जावडेकर यांची चर्चा झाली.
पुणे आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे युनिट छत्रपती संभाजीनगरला हलविण्याचा निर्णय रद्द करावा या संदर्भात जावडेकर यांनी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. जावडेकर सध्या हैदराबाद येथे असून, त्यांनी या विषयासंदर्भात अनुराग ठाकूर यांच्याशी फोनवर चर्चा केली. तसेच पुण्यातील विविध क्षेत्रातून या निर्णयाला विरोध झाला होता. त्यामुळे एकूण परिस्थिती लक्षात घेता पुणे आकाशवाणीतील वृत्त विभाग बंद होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.