नवविवाहित जोडप्यांना आता थेट मिळणार खंडोबाचे दर्शन, जेजुरी देवस्थानचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:01 PM2018-01-22T12:01:18+5:302018-01-22T12:06:16+5:30
विवाहानंतर कुलदैवत खंडोबा देवाच्या दर्शनाला येणाऱ्या नववधू-वराला आता थेट मंदिरात प्रवेश देऊन देवदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय देवसंस्थान विश्वस्त व व्यवस्थापनाने घेतला आहे.
जेजुरी : विवाहानंतर कुलदैवत खंडोबा देवाच्या दर्शनाला येणाऱ्या नववधू-वराला आता थेट मंदिरात प्रवेश देऊन देवदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय देवसंस्थान विश्वस्त व व्यवस्थापनाने घेतला आहे. तसेच नव वधूची खणा-नारळाने ओटीही भरण्यात येणार आहे. ही सुविधा फक्त नव वधू-वरांसाठी करण्यात येत असून, त्यांच्यासमवेत येणाऱ्या नातलगांना दर्शनरांगेचा वापर करावा लागणार आहे, शनिवार (दि. २०) पासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून, याबाबत नव वधू-वर दाम्पत्यांकडून याचे स्वागत करण्यात आले आहे.
जेजुरी हे महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे लोकदैवत समजले जाते. कुटुंबातील मुलाचा किंवा मुलीचा विवाह ठरल्यानंतर राज्याच्या विविध प्रांतातील भाविक येथे दाखल होऊन खंडेरायाची पूजा -अभिषेक करीत मोठ्या श्रद्धेने लग्नपत्रिका देवाला अर्पण करतात. नंतरच नातलगांना पत्रिका वाटपाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. ही परंपरा आजही कायम आहे. यामुळे येथून पुढे देवाला अर्पण झालेल्या पत्रिकेतील वधू-वरांच्या माता-पित्यांना देवसंस्थानच्या वतीने शुभेच्छा संदेश पाठविण्यात येणार आहेत.
विवाहानंतर संसारिक जीवनाची सुरुवात करण्यापूर्वी आपल्या नव वधू-वर परिवारासह जेजुरीला येतात. वराकडून वधूला कडेवर उचलून घेत गडकोटाच्या किमान पाच पायऱ्या चढून मंदिरात जाऊन कुलदैवताचे दर्शन घेतात. तळीभंडार, जागरण - गोंधळ आदी धार्मिक विधीही करतात. गेली शेकडो वर्षांची ही परंपरा आहे, मात्र सध्या जत्रा-यात्रा उत्सवांच्या काळात विवाहाच्या पोशाखात आणि कपाळी मुंडावळ्या असलेल्या नवविवाहित दामपत्यास रांगेत उभे राहावे लागते, नववधू-वरांची ही अडचण लक्षात घेऊन त्यांना तत्काळ मंदिरात दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. गडकोट आवारातील कार्यालयात नवविवाहित वधू-वरांची रजिस्टरला नोंद घेऊन त्यांना व्यवस्थापनातील कर्मचारी मुख्य मंदिरात घेऊन जात दर्शन घडवणार आहेत. मात्र, त्यांच्याबरोबर असलेल्या नातलगांना दर्शनरांगेतूनच मंदिर प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर पुन्हा कार्यालयात आणून नववधूची खणा-नारळाने ओटी भरण्यात येईले. या सुविधेसाठी पुढील आठवड्यापासून महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. देवांना अर्पण केलेल्या लग्नपत्रिकांनाही येथून पुढे शुभेच्छांचे संदेश पाठविण्यात येणार आहेत. देवसंस्थांकडून या उपक्रमास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपासून सुरू केलेल्या उपक्रमाबाबत भाविकांनी स्वागत केले़.