येत्या १० दिवसात सारथीचे सर्व प्रश्न सोडवणार :विजय वडेट्टीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 07:04 PM2020-02-20T19:04:25+5:302020-02-20T19:06:32+5:30
विद्यावेतन मिळत नसल्यामुळे लोकसेवा आयोगाची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी नुकतेच दिल्ली येथे जंतर- मंतरवर आंदोलन केले होते. तसेच सारथीच्या माध्यमातून दिले जाणारे थकित विद्यावेतन तात्काळ मिळावे,अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी प्रथमच सारथी संस्थेला भेट देवून संस्थेतील कामाची माहिती घेतली.
पुणे: सारथीच्या स्वायत्ततेबाबत पुढील आठवड्यात होणा-या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठक चर्चा केली जाईल.त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या प्रलंबित निधीसह इतर प्रश्न येत्या दहा दिवसात सोडविले जातील, अशी माहिती बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी सांगितले. तसेच पुढील काळात मराठा-कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून नोक-या उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न केले जातील,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
विद्यावेतन मिळत नसल्यामुळे लोकसेवा आयोगाची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी नुकतेच दिल्ली येथे जंतर- मंतरवर आंदोलन केले होते. तसेच सारथीच्या माध्यमातून दिले जाणारे थकित विद्यावेतन तात्काळ मिळावे,अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी प्रथमच सारथी संस्थेला भेट देवून संस्थेतील कामाची माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना वडेट्टीवार बोलत होते.
ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाची रक्कम थकली होती.त्यामुळे दिल्लीतील विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, दोन दिवसातच दिल्लीतील सर्व विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडविण्यात आला.सारथी संस्थेच्या स्थापनेचा उद्देश पूर्ण झाला पाहिजे.आता सारथीच्या कामाचा आढावा मंत्री म्हणून मी स्वत: दर महिन्याला घेणार आहे. त्याचप्रमाणे दर तीन महिन्यांनी सारथीच्या कामाचा अहवाल उपसमितीसमोर ठेवला जाईल. त्यामुळे या संस्थेच्या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना होतो किंवा नाही. हे तपासले जाईल.
वडेट्टीवार म्हणाले, सारथीच्या माध्यमातून राबविल्या जाणा-या योजना व उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.तसेच त्यात सुधारणा करण्याबाबत अधिका-यांशी चर्चा करण्यात आली. सारथी संस्थेमध्ये भ्रष्टाचार झाला किंवा नाही. याबाबत अधिका-यांकडून तपास केला जात आहे.तपासणीनंतरच यावर भाष्य करता येईल,असे नमूद करून वडेट्टीवारम्हणाले,महाविद्यालयांमधील शिष्यवृत्ती वितरणात झालेल्या गौरव्यवहाराची चौकशी सुरू असून त्यात दोषी असणा-यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल.