पुणे शहरात पुढील ६ दिवस असणार पावसाचे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 11:49 AM2019-10-07T11:49:52+5:302019-10-07T11:51:10+5:30
पाऊस पाहून उमेदवारांना करावे लागणार नियोजन
पुणे : ऑक्टोबर महिना सुरू झाला असला, तरी अद्याप पावसाळा संपलेला नाही़. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर, उरलेल्या १३ दिवसांत जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या उमेदवारांच्या मनसुभ्यावर पाणी फेरण्याची शक्यता आहे़. रविवारच्या सुट्टीचे निमित्त साधून मतदारसंघातील अधिकाधिक भागात संपर्क साधण्याचा उमेदवारांनी प्रयत्न केला़. त्यासाठी काही उमेदवारांनी दुचाकी रॅलीचे आयोजन केले होते, तर काही उमेदवार पदयात्रा करीत होते़. त्याचवेळी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने उमेदवार व कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ उडाली़. काही जणांनी भर पावसात रॅली तशीच पुढे नेली, तर काही उमेदवार पदयात्रा थांबवून आडोशाला जाऊन पाऊस थांबण्याची वाट पाहू लागले़.
पुणे शहरात गेल्या चार महिन्यांत भरभरून पाऊस झाला़. आता थोडा जरी पाऊस पडला, तरी रस्त्यांवर तळी साचू लागली आहेत़. त्यात परतीचा हा पाऊस अचानक इतका जोरदार पडतो की नुसता रस्ता ओलांडायचा म्हटले तरी, तोपर्यंत माणूस संपूर्ण भिजून जातो़. शनिवारी सायंकाळी अनेकांनी पदयात्रांचे आयोजन केले होते; पण चार वाजण्याच्या सुमारास पावसाची जोरदार सर आली़. त्यामुळे पदयात्रा सुरू करण्यात अनेक उमेदवारांना उशीर झाला होता़
रविवारी दुपारीही तासभर जोरदार पाऊस झाला होता़. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात १४ मिमी पावसाची नोंद झाली होती़.
राजस्थानमधून परतीचा पाऊस सुरू झाला नसला, तरी हा परतीच्या पावसासारखाच पाऊस पडत आहे़. सायंकाळच्या सुमारास अचानक आकाशात ढगांची गर्दी होते आणि थोड्या वेळात जोरदार पाऊस पडतो़. तास, दोनतास झोडपून काढल्यानंतर तो थांबतो़. तोपर्यंत शहरातील रस्त्यांचे तळे झालेले असतात़ अशा पावसात उमेदवारांना प्रचाराला जाण्याची सोय उरत नाही़.
रस्त्यावर तळी साचलेली असताना आपण प्रचाराला गेलो, तर मतदारांच्या रागाला तोंड द्यावे लागेल अशी उमेदवारांना भीती वाटते़. त्यामुळे रविवारी अनेकांनी पाऊस आल्यावर आपल्या पदयात्रा थांबविल्या़.