इंदापुरसाठी येणारे पंधरा दिवस महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:12 AM2021-03-14T04:12:21+5:302021-03-14T04:12:21+5:30
इंदापूर: कोराेनाबाधितांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. येणाऱ्या १५ दिवसांमध्ये ही संख्या वाढू शकते अशी तज्ञांनी शक्यता वर्तवली ...
इंदापूर: कोराेनाबाधितांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. येणाऱ्या १५ दिवसांमध्ये ही संख्या वाढू शकते अशी तज्ञांनी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. विनाकारण नागरिकांनी गर्दी टाळावी असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. बैठकीत तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
दत्तात्रय भरणे म्हणाले, इंदापूर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या २१९ आहेत. त्यापैकी १७९ हे ग्रामीण तर ४० बाधित शहरी भागातील आहेत. या सर्वांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर दोन गावे हॉटस्पॉट आहे. बाधितांची संख्या वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे नियमांचे पालन न करणे. धार्मिक, सामाजिक, तसेच लग्न सोहळ्यातील गर्दी नियंत्रीत होणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखून गर्दी टाळावी.
राज्यमंत्री भरणे म्हणाले, गेली ३५ वर्षे शेतकऱ्यांच्या महत्त्वाचा लाकडी लिंबोडी उपसा सिंचन योजनेचा प्रश्न प्रलंबित होता. मात्र, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून ही योजना मंजूर होण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याला यशही मिळाले. या योजनेमध्ये सोळा गावातील शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याचा फायदा होणार आहे. साडे सतरा हजार एकर शेती क्षेत्राला पाणी या उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे असेही ते म्हणाले.
तालुक्यातील १२५ कोटी रकमेच्या रस्त्यांच्या कामाचे टेंडर झालेले आहे. तालुक्यातील विकासकामांना कधीही निधी कमी पडू देणार नाही. माझे काम सर्वसामान्य माणसांसाठी आहे. त्यामुळे विरोधकांनी कोणतीही टीका केली तरी त्याकडे लक्ष देण्याची गरज वाटत नसल्याचेही राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले.