'पुढे मुलीचा खून झालाय; आम्ही पोलीस आहोत, तुमच्या संरक्षणार्थ दागिने आमच्याकडे द्या', असे सांगून महिलेला लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 05:51 PM2021-08-05T17:51:56+5:302021-08-05T17:52:11+5:30
मंचर गावच्या हद्दीत पिंपळगाव फाटा येथे ही घटना घडली
मंचर : पोलीस असल्याचा बनाव करून सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक महिलेचे दागिने लुटून नेल्याची गंभीर घटना घडली आहे. मंचर गावच्या हद्दीत पिंपळगाव फाटा येथे ही घटना घडली असून दोन जणांविरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंचर येथील रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स येथे राहणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षिका सुनंदा तानाजी वाबळे या बुधवारी दुपारी साडेबारा वाजता पेन्शनचे पैसे काढण्यासाठी बँकेत गेल्या होत्या. ते पैसे पतसंस्थेत भरून त्या घरी येत असताना पिंपळगाव फाट्याजवळ एका मोटारसायकलसोबत दोन व्यक्ती उभ्या होत्या. त्यांतील एकाने वाबळे यांना 'मावशी इकडे या' म्हणून हाक मारली. ''पुढे एका मुलीचा खून झाला आहे. आम्ही पोलीस आहे. तुमच्या संरक्षणार्थ तुमच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून द्या ते मी तुमच्या पिशवीत सेफ मध्ये ठेवतो. असे म्हणाले''
त्यावेळी वाबळे यांनी तुम्ही पोलिसांचा ड्रेस घातलेला नाही. तुमच्या पायात बूट नाहीत तुम्ही कसे पोलीस आहात. असे विचारल्याने त्यांनी वाबळे यांना कोणते तरी ओळखपत्र दाखवले. वाबळे यांच्याकडे चष्मा नसल्याने त्यांना ते ओळखपत्र नीट व्यवस्थित वाचता आले नाही. त्यावेळी त्या दोघांनी वाबळे यांना बोलण्यामध्ये गुंतवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसूत्र घेऊन हातचलाखीने ते पिशवी मध्ये टाकले असे दाखवून मोटरसायकलवर निघून गेले.
त्यानंतर वाबळे या घरी येऊन त्यांनी पिशवी पाहिली असता त्यांना सोन्याचे मनी मंगळसूत्र दिसले नाही. त्यांचे तीन तोळे वजनाचे अंदाजे ९० हजार रुपये किंमतीचे मनी मंगळसूत्र हातचलाखी करून त्या चोरट्यांनी पळवून नेले असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.