पुण्याचा पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:22 AM2021-01-13T04:22:28+5:302021-01-13T04:22:28+5:30
वारजे : पुढील महापालिका निवडणुकीला अजुन एक वर्ष अवकाश तसला तरी पुढचा महापौर हा राष्ट्रवादीचाच असेल, असा ठाम विश्वास ...
वारजे : पुढील महापालिका निवडणुकीला अजुन एक वर्ष अवकाश तसला तरी पुढचा महापौर हा राष्ट्रवादीचाच असेल, असा ठाम विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी वारजे येथे वारजे येथे व्यक्त केला. नगरसेविका सायली वांजळे यांच्या प्रयत्नातून झालेल्या येथील न्यू अहिरे गाव ते शिंदे पूल या सुमारे १ किमी लांब माजी आमदार स्व. रमेश वांजळे जॉगिंग ट्रॅक व वाचनालयाचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ, नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, लक्ष्मी दुधाने, सायली वांजळे-शिंदे, हर्षदा वांजळे, अनिता इंगळे, बाबा धुमाळ, शुक्राचार्य वांजळे, पूजा पारगे, स्वाती पोकळे, सुरेखा दमीष्टे, अतुल दांगट, मयुरेश वांजळे, राजीव पाटील उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या, सध्या ईडीची नोटीस देऊन राजकरण करण्याचा प्रघात असला तरी आम्ही तसे वागत नाही. अजित पवार सध्या पालकमंत्री असून ते पक्ष भेद न करता पुण्यासाठी भरघोस निधी आणतील.
दिलीप बराटे म्हणाले, की या भागात २० वर्षात सतत मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत. यासाठी ताई व दादा यांची दूरदृष्टी आहे. २३ गावांचा समावेश व गुंठेवारी कायदा हे जिवंत उदाहरण आहे.
सायली वांजळे म्हणाल्या, १० जूनला वडिलांच्या पुण्यस्मरण निमित्त वृक्षारोपण केले. कोविड काळात महत्वाचे असलेले या ठिकाणी ओपन जिम केले. गणपती माथा येथे खास महिलांसाठी पहिले शौचालय उपलब्ध करून देताना आनंद होतो आहे.
शुक्राचार्य वांजळे यांनी अहिरेगावच्या पुनर्वसनाबाबत, मनपाची सदोष कररचना, ७/१२ वरील अटी बाबत समस्या मांडल्या. दिनकर वांजळे यांनी आभार मानले.
कर्तुत्ववान मुलगी
सायली ही कर्तृत्ववान वडलांची कर्तृत्ववान मुलगी असल्याचे मत सुळे यांनी व्यक्त केले. लग्न झाल्यावरही घर व लहान मुलाला सांभाळत ती प्रत्येक बैठकीला आवर्जून उपस्थित असते याचे कौतुक आहे.
फोटो ओळ : येथील माजी आमदार स्व. रमेश वांजळे जॉगिंग ट्रॅकचे उदघाटन करताना खासदार सुप्रिया सुळे, हर्षदा वांजळे, सायली वांजळे-शिंदे, अनिता इंगळे व इतर मान्यवर.