मनपा शाळेलाही आयएसओ मानांकन
By admin | Published: October 1, 2015 12:41 AM2015-10-01T00:41:33+5:302015-10-01T00:41:33+5:30
पटसंख्येअभावी महापालिकेच्या शाळा बंद होत असताना तळवडेतील कै. किसनराव भालेकर शाळेस गुणवत्तेचे ‘आयएसओ ९००१’ मानांकन मिळाले आहे
विश्वास मोरे, पिंपरी
पटसंख्येअभावी महापालिकेच्या शाळा बंद होत असताना तळवडेतील कै. किसनराव भालेकर शाळेस गुणवत्तेचे ‘आयएसओ ९००१’ मानांकन मिळाले आहे. अन्य शासकीय शाळांना शैक्षणिक गुणवत्ता आणि आदर्श कार्यप्रणालीचा वस्तुपाठ घालून देणारी राज्यातील महापालिकेची ही पहिली शाळा ठरली आहे.
महानगरपालिका शिक्षण मंडळाने पुढाकार घेऊन तळवडेतील शाळेला आदर्श करण्याचा संकल्प गतवर्षी सोडला. आयएसओ मानांकनाच्या निकषांची पूर्तता करण्यासाठी सुरुवातीला शाळेतील पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
याचा कृती आराखडा तयार करून नियोजनानुसार अंमलबजावणी झाली. पटसंख्या कमी होणार नाही, विद्यार्थी अनुपस्थिती कमी करणे, मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्यात आला. तसेच, शिक्षकांची बायोमेट्रिक हजेरी, तसेच ई-लर्निंग, नैसर्गिक ऊर्जास्रोतांचा वापर करून सोलरवर वीजनिर्मिती करणे, गांडूळखत प्रकल्प, औषधी वनस्पतीची लागवड, परिसराचे सुशोभीकरणही करण्यात आले. संगणक, विज्ञान लॅब, लायब्ररीची निर्मिती, व्यवसायाभिमुख शिक्षणासाठी प्रयत्न सुरू केले.
शासकीय, निमशासकीय शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. महापालिका शाळेतही गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाऊ शकते. महापालिका शाळांकडे विद्यार्थी वळावेत, पटसंख्या वाढावी यासाठी गुणवत्तावाढीचा उपक्रम राबविण्यात आला. प्रायोगिक तत्त्वावर तळवडेतील शाळेत हा उपक्रम राबविला. आयएसओ ही गुणवत्ता चळवळ महापालिका शाळांत राबवायची आहे. अशा प्रकारची आयएसओ प्रमाणपत्र मिळविणारी पहिली शाळा असावी.
- आशा उबाळे, शिक्षणाधिकारी, शिक्षण मंडळ, महापालिका