‘स्वयंसेवी संस्थांनी स्मारकाचे जतन करावे’
By admin | Published: December 21, 2015 12:29 AM2015-12-21T00:29:36+5:302015-12-21T00:29:36+5:30
शहरात अनेक महापुरुषांच्या मूर्ती, पुतळे आणि स्मारकांमुळे शहराच्या सौंदर्यात आणि नावलौकिकात भर पडते. मात्र, जयंती आणि पुण्यतिथी सोडल्यास वर्षभर या पुतळ्याकडे कोणी लक्ष देत नाही.
शहरात अनेक महापुरुषांच्या मूर्ती, पुतळे आणि स्मारकांमुळे शहराच्या सौंदर्यात आणि नावलौकिकात भर पडते. मात्र, जयंती आणि पुण्यतिथी सोडल्यास वर्षभर या पुतळ्याकडे कोणी लक्ष देत नाही. या स्मारक आणि पुतळ्याची जबाबदारी शहरातील सामाजिक संस्था आणि संघटनांनी घ्यावी, अशी मागणी शिवराज्य संघटनेचे अध्यक्ष अजय जाधव यांनी महापालिकेकडे केली आहे.
मूर्ती, पुतळे आणि स्मारकांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. शहरातील तसेच, बाहेरील नागरिक या स्मारकांना आवर्जून भेट देतात. मात्र, महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी वगळता इतर दिवशी या स्मारकांकडे दुर्लक्ष होत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. वर्षभर या ठिकाणी लाजिरवाणी परिस्थिती असते. अनेक घटकांनी महापुरुषांची जातीपातींत, प्रांताप्रातांत व पक्ष-संघटनांमध्ये वाटणी करून टाकली आहे. सर्व समाज संघटित करण्याचा त्यांच्या जीवन उद्देशालाच आपण विसरलो असल्याचे जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे.
या स्मारकांची जबाबदारी शहरातील सामाजिक संस्था आणि संघटनांनी घ्यावी. स्मारकांची आठवड्यातून एकदा स्वच्छता करावी. सुशोभीकरण करावे. महापुरुषांच्या विचारांचा जागर घडवून आणण्यासाठी चित्र प्रदर्शन, व्याख्याने, दीपोत्सव, पोवाडा, चरित्र कथाकथन, शिववंदना आदी उपक्रम राबवावेत, असे त्यांनी नमूद केले आहे.
संघटनेतर्फे संभाजीनगर, चिंचवड येथील बर्ड व्हॅलीतील संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन नियमितपणे केले जाते. महिन्यातून एकदा मूर्तीची स्वच्छता करून शिववंदना होते. व्याख्याने, दीपोत्सव, पोवाडा, चरित्र कथाकथन, मर्दानी खेळ आदी उपक्रम शहरातील सार्वजनिक मंडळ, संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने कार्यक्रम घेतले जातात. याच पद्धतीने स्मारकाची स्वच्छता आणि देखभाल करण्याची जबाबदारी प्रत्येक स्वयंसेवी संघटनांनी घ्यावी. यामुळे पुतळ्यांची विटंबनेवरून
दंगली भडकण्याची वेळ येणार नाही. यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, असे जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)