पुणे मेट्रोचा मार्ग मोकळा : नदी पात्रातील मेट्रोला एनजीटीचा हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 06:45 PM2018-08-03T18:45:22+5:302018-08-03T18:46:42+5:30
पुणे मेट्रोच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले असून नदीपात्रातूनही मेट्रो धावताना दिसेल.
पुणे : पुणेमेट्रोबाबत दिल्ल्ली येथील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) सुरू असलेला खटल्याचा निकाल आज जाहीर झाला असून नदी पात्रातील मेट्रो रस्त्याला राष्ट्रीय हरित न्यायाधिकारीची काही अटींच्या आधारे परवानगी दिली आहे. त्यामुळे पुणे मेट्रोच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले असून नदीपात्रातूनही मेट्रो धावताना दिसेल.
पुणे मेट्रोच्या नदीपात्रामधून जात असलेल्या मार्गाला शहरातील पर्यावरण प्रेमींनी विरोध केला असून याच्या विरोधात एनजीटीमध्ये याचिका दाखल करण्यात आली होती.नदीपात्रातील मार्गाला विरोध करीत उद्योगपती अनु आगा, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर, आरती किर्लोस्कर आणि अॅड. सारंग यादवाडकर यांनी एनजीटीमध्ये याचिका दाखल केली. दरम्यानच्या काळात पुण्यातील एनजीचीचे कामकाज बंद होते. त्यामुळे हा खटला दिल्ली येथे वर्ग करण्यात आला होता. दरम्यान तीन आठवड्यांसाठी येथील खटल्यांच्या सुनावणीसाठी न्यायाधिशांची नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्तीची मुदत संपल्यानंतर पुण्यातील कामकाज दर गुरुवार आणि शुक्रवारी व्हीसीद्वारे चालविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर कामकाज पूर्ण होऊन आज निकाल सुनावण्यात आला. दरम्यान हा निर्णय पर्यावरण विरोधी असून आम्हाला अमान्य असल्याची प्रतिक्रिया याचिकाकर्त्यांचे वकील असिम सरोदे यांनी नोंदवली.