महाराष्ट्र इसिस मॉड्युलप्रकरणी NIA मोठी कारवाई; दहशतवादी डॉ. अदनानली सरकारला कोंढव्यातून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 04:52 PM2023-07-27T16:52:54+5:302023-07-27T16:57:12+5:30
ISIS महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुरुवारी आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे....
पुणे : देशविघातक कृत्याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस आणि विविध राष्ट्रीय तपास संस्था कारवाई करत आहेत. आता आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. ISIS महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुरुवारी आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे.
पुणे शहरातील कोंढवा परिसरात छापा टाकून ही कारवाई केली आहे. यामध्ये डॉ. अदनानली सरकार (४३) याला अटक करण्यात आली. एनआयएने सरकारच्या कोंढवा घराच्या झडतीदरम्यान इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि ISIS शी संबंधित अनेक दस्तऐवज जप्त केली आहे. हा आरोपी तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी भरती करत होता, अशी माहितीही तपासात समोर आली आहे.
या आरोपीने इस्लामिक स्टेट (IS)/इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (ISIL)/इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया (ISIS)/ Daish/Islamic State in Khorasan सारख्या वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणार्या ISIS च्या दहशतवादी कारवाईमध्ये मदत केल्याचे समोर आले. एनआयएच्या तपासानुसार, आरोपी अदनानली सरकार भारत सरकारविरोधात दहशतवादी कृत्य करण्यासाठी विविध दहशतवादी संघटना मदत करत होता.
या प्रकरणातील ही पाचवी अटक आहे, ज्याची NIA ने 28 जून 2023 रोजी नोंद केली होती. मुंबई, ठाणे आणि पुणे येथे शोध घेतल्यानंतर 3 जुलै 2023 रोजी NIA ने इतर चार जणांना मुंबईत अटक केली होती. मुंबईतील तबिश नासेर सिद्दीकी, पुण्यातील जुबेर नूर मोहम्मद शेख, ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला अशी त्यांची नावे आहेत.