एनआयएचा पुण्यात छापा; १९ वर्षीय तरुण ताब्यात, संशयास्पद कागदपत्रे जप्त
By विवेक भुसे | Published: December 18, 2023 04:45 PM2023-12-18T16:45:09+5:302023-12-18T16:46:01+5:30
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ठाणे पुण्यासह राज्यातील वेगवेगळ्या भागात ९ डिसेंबर रोजी छापे टाकले होते
पुणे: राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी सॅलसबरी पार्क परिसरात छापा घातला. या पथकाने १९ वर्षीय तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून संशयास्पद कागदपत्रे जप्त केले आहेत. बंगळुरू येथेही एनआयएने या संबंधात कारवाई केली आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ठाणे पुण्यासह राज्यातील वेगवेगळ्या भागात ९ डिसेंबर रोजी छापे टाकले होते. एनआयएच्या पथकाने ठाणे शहरातील पडघा आणि राज्यातील वेगवेगळ्या भागात कारवाई करून दहा संशयितांना ताब्यात घेतले होते. तपासात मिळालेल्या माहितीनुसार एनआयएच्या पथकाने पुण्यातील सॅलसबरी पार्क परिसरात सोमवारी कारवाई करून एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून काही संशयास्पद कागदपत्रे, मोबाइल जप्त करण्यात आला.
दरम्यान, कोथरूडमध्ये पकडण्यात आलेले दोघे एनआयएकडून फरारी घोषित असलेले दहशतवादी असल्याचे स्पष्ट झाले होते. हे प्रकरण एनआयएकडे साेपविण्यात आल्यानंतर त्यांच्या चौकशीत दहशतवादाचे पुणे मॉड्यूल समोर आले होते. दहशतवादी विचारधारेचा प्रसार, तसेच तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढणाऱ्या इसिसच्या महाराष्ट्र गटाकडून पुणे, मुंबईसह देशभरात बाॅम्बस्फोट करण्याचा कट रचण्यात आला होता.
याप्रकरणात पूर्वी मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमीद खान, मोहम्मद युनूस मोहम्मद याकुब साकी उर्फ आदिल उर्फ आदिल सलीम खान (दोघेही रा. रतलाम, मध्यप्रदेश), कादीर दस्तगीर पठाण उर्फ अब्दुल कादीर (रा. कोंढवा), समीब नासीरउद्दीन काझी (रा. कोंढवा), जुल्फीकार अली बडोदावाला उर्फ लालाभाई उर्फ सईफ, शामिल साकीब नाचन, अकिफ आतिफ नाचन (तिघेही रा. पडघा, जि. ठाणे) यांना अटक केली होती.