पुणे: इसिसशी संबंधाच्या संशयावरून वानवडीत एनआयएकडून छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 10:17 AM2022-03-10T10:17:38+5:302022-03-10T10:20:23+5:30
पुणे : दहशतवादी संघटना ‘ इसिस’शी संबंध असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) वानवडीत एका घरात छापा मारला. याप्रकरणात ...
पुणे : दहशतवादी संघटना ‘इसिस’शी संबंध असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) वानवडीत एका घरात छापा मारला. याप्रकरणात एकाची चौकशी करण्यात आली. तसेच काही कागदपत्रे आणि इलेक्ट्राॅनिक्स वस्तू असे साहित्य जप्त करण्यात आले.
वानवडी परिसरात तल्हा लियाकत खान (वय ३८) वास्तव्यास आहे. इसिसशी संबंध असल्याचा संशयावरून एनआयएच्या पथकाने खान याच्या घरावर छापा टाकून कारवाई केली. खान याच्या घरातून कागदपत्रे आणि इलेक्ट्राॅनिक्स वस्तू जप्त करण्यात आल्या असून, या प्रकरणात खान याची चौकशी सुरू असल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली. ‘इसिस’शी संबंध असल्याचा संशय तसेच देशभरात घातपात कारवायाच्या तयारीत असल्याच्या संशयावरून दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने (स्पेशल सेल) ८ मार्च २०२० रोजी दिल्लीतून जैनब सामी वाणी आणि त्याची पत्नी हिना बशीर बेग (रा. जामीयानगर, दिल्ली) या काश्मिरी दाम्पत्याला अटक केली हाेती. हा गुन्हा एनआयएकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला. त्यांच्या चौकशीत चौघा जणांची नावे निष्पन्न झाली होती.
त्यानंतर दिल्ली पोलिसांनी अब्दुला बासित, सादिया अन्वर शेख, नबील सिद्दीक खत्री, अब्दुर रहमान ऊर्फ डाॅ. ब्रेव्ह यांना अटक केली होती. आतापर्यंत याप्रकरणात सहा जणांविरोधात एनआयएने न्यायालयात दोषाराेपपत्र दाखल केले आहे. इसिससाठी काम करणाऱ्यासाठी सेल स्थापन करून त्याद्वारे भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी समविचारी लोकांचा पाठिंबा मिळवून इसिसच्या विचारसरणीचा प्रचार करणे, हे काम या गटाचे होते. शस्त्रे गोळा करण्यासाठी, निधी उभारण्यासाठी आणि हत्या घडवून आणण्याचे त्यांचे उद्दिष्ट असल्याचा आरोप दोषारोपपत्रात करण्यात आला आहे.
तीन दिवसापासून तपास
या प्रकरणाचा तपास एनआयएकडून करण्यात येत असून, गेल्या दोन ते तीन दिवसापासून एनआयएचे पथक पुण्यात तपास करीत आहे. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, तल्हा खान याचा ‘इसिस’शी संबंध असल्याचा संशय असल्याने, एनआयएच्या पथकाने त्याच्या वानवडीतील घरात छापा टाकून काही कागदपत्रे आणि इलेक्ट्रॅानिक्स वस्तू जप्त केल्या. याप्रकरणात खान याची चौकशी सुरू असल्याची माहिती ‘एनआयए’कडून देण्यात आली.