कोरेगाव भीमा तपासासाठी एनआयएचे पथक पुण्यात; पुणे पोलिसांनी दिली नाहीत कागदपत्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 05:48 AM2020-01-28T05:48:55+5:302020-01-28T05:49:23+5:30
एल्गार परिषद व कोरेगाव भीमा दंगलीची एसआयटी चौकशीची मागणी शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.
पुणे : एल्गार परिषदेच्या तपासासाठी एनआयएचे अधिकारी सोमवारी पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले. मात्र, राज्य सरकारकडून पत्र मिळाल्याशिवाय कागदपत्रे दिली जाणार नाहीत, अशी भूमिका पुणे पोलिसांनी घेतली.
एनआयएचे पोलीस अधीक्षक विक्रम खलाटे यांच्यासह ८ जणांचे पथक तीन तास आयुक्तालयात होते. त्यांनी एल्गार परिषदेच्या तपासाप्रकरणी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त व शिवाजी पवार यांच्याकडून माहिती घेतली. राज्य सरकारने हा तपास एनआयएकडे सोपविल्याचे वा एनआयएला कागदपत्रे देण्याचे पत्र दिले नसल्याने आम्ही गृहविभागाकडून माहिती घेऊनच कागदपत्रे देऊ , असे पोलिसांनी त्यांना सांगितले.
एल्गार परिषद व कोरेगाव भीमा दंगलीची एसआयटी चौकशीची मागणी शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मात्र, शुक्रवारी अचानक हा तपास एनआयएकडे सोपविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. हा तपास एनआयएकडे दिला असला तरी पुणे पोलिसांच्या वर्तनाची चौकशी करण्याची मागणी शरद पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
एसआयटीची आज स्थापना?
कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी तत्कालीन फडणवीस सरकारने पूर्वगृह ठेवून कारवाई केल्याचा आक्षेप समोर आल्यामुळे पोलिसांनी केलेल्या तपासाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) स्थापनेची घोेषणा मंगळवारी होण्याची शक्यता आहे. त्याबाबत सोमवारी गृह विभाग व पोलीस मुख्यालयातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात या पथकाची कार्यकक्षा व रचना निश्चिती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.