Pune: एनआयबीएम रस्त्यावरील अडथळा ठरणारी अतिक्रमणे दोन तासात हटविली
By निलेश राऊत | Published: August 23, 2023 02:59 PM2023-08-23T14:59:35+5:302023-08-23T15:01:06+5:30
सुमारे दीड किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे तातडीने हटविण्यात आली...
पुणे : महापालिका प्रशासनाने मंगळवारी एनआयबीएम रस्त्यावरील अतिक्रमणांवर हातोडा चालवला. प्रशासनाने केलेल्या कारवाईने अवघ्या दोन तासांत रस्ता अतिक्रमणमुक्त रस्ता झाला. सुमारे दीड किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे तातडीने हटविण्यात आली.
या शहरातील रस्त्यांवर अतिक्रमण झाल्याने वाहतूक समस्येने नागरिक हैराण झाले होते. ही अतिक्रमणे आणि रस्त्याला अडथळा ठरणारी बांधकामे हटविण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या नियंत्रणाखाली हे काम सुरू आहे.
एनआयबीएमकडून उंड्रीकडे जाणाऱ्या रस्त्याची पाहणी करण्यात आली. तेव्हा या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व फलक व इतर अडथळे दिसून आले. विकास ढाकणे यांनी परिसराची पाहणी करून संबंधित सर्व अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे आदेश दिले.
सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील व हडपसर-मुंढवा प्रभाग कार्यालयाचे अतिक्रमण निरीक्षक धम्मानंद गायकवाड यांच्या पथकाने या गृह संकुलासमो रस्त्याला लागून असलेल्या मोकळ्या जागेतील सर्व अतिक्रमणे हटवली. या कारवाईत ५ स्टॉल्स, २० फेरीवाले आणि खाजगी जागेच्या समोरील मार्जिनमधील अतिक्रमणे हटविण्यात आली. हे ऑपरेशनही त्याच वेळी करण्यात आले. त्यासाठी इतर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही येथे नियुक्ती करण्यात आली होती.