लोणावळा शहरासह मावळ तालुक्यात २५ डिसेंबर ते ५ जानेवारी 'नाईट कर्फ्यू'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 05:05 PM2020-12-25T17:05:36+5:302020-12-25T17:06:40+5:30
ख्रिसमस व थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर निर्णय
लोणावळा : कोरोनाच्या दुसर्या लाटेचे संक्रमण रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महानगरपालिका हद्दींमध्ये नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुणे ग्रामीण जिल्ह्यातील लोणावळा, अँम्बे व्हॅली, लवासा, भुशी धरण, मुळशी धरण, ताम्हाणी घाट, सिंहगड रोड, खडकवासला या पर्यटनस्थळी तसेच फार्महाऊस, रिसाॅर्ट आदी ठिकाणी 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेत पुणे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी मावळ, मुळशी व हवेली तालुक्यात 25 डिसेंबर 2020 ते 5 जानेवारी 2021 दरम्यान रात्री 11 ते सकाळी 6 पर्यत जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.
पुणे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी मावळ, मुळशी व हवेली तालुक्यातील सर्व कार्यक्षेत्रात व शिरुर तालुक्यातील काही गावांमध्ये 25 डिसेंबर 2020 ते 5 जानेवारी 2021 दरम्यान रोज रात्री 11 ते सकाळी 6 पर्यत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वेय जमावबंदीचा आदेश पारित केला आहे. या सर्व ठिकाणी आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहे.
व्यावसायिकांची नाराजी...
मागील सात ते आठ महिन्यापासून लोणावळा व परिसरातील सर्व हाॅटेल व फार्महाऊस तसेच पर्यटनस्थळे बंद होती. ख्रिसमस व थर्टी फस्टच्या पार्ट्यांकरिता लोणावळा, पवनानगर व मावळातील इतर पर्यटनस्थळे व व्यावसायिक सज्ज झाले होते. बहुतांश ठिकाणी बुकिंग पुर्ण झाले होते. अशातच शासनाचा नाईट कर्फ्यूचा आदेश आल्याने सर्व नियोजनावर पाणी फिरणार असल्याने व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.