रात्र उघड्यावरच, ना स्वच्छतागृह, ना स्नानगृह! पोलिस भरतीसाठी आलेल्या तरुणांची गैरसोय

By नारायण बडगुजर | Published: June 19, 2024 11:03 AM2024-06-19T11:03:36+5:302024-06-19T11:04:04+5:30

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर शहरात पहिल्यांदाच पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे...

Night in the open, no toilet, no bathroom! Disadvantage of youths who come for police recruitment | रात्र उघड्यावरच, ना स्वच्छतागृह, ना स्नानगृह! पोलिस भरतीसाठी आलेल्या तरुणांची गैरसोय

रात्र उघड्यावरच, ना स्वच्छतागृह, ना स्नानगृह! पोलिस भरतीसाठी आलेल्या तरुणांची गैरसोय

पिंपरी : रात्र उघड्यावरच, ना स्वच्छतागृह, ना स्नानगृह...अंगावर खाकी वर्दी चढविण्याच्या तयारीत आलेल्या अनेक तरुणांना अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. भोसरीतील इंद्रायणीनगर येथील मैदानात पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणीची प्रक्रिया बुधवारपासून (दि. १९) राबविण्यात येत आहे. तिच्या पूर्वसंध्येला परजिल्ह्यातील उमेदवारांनी मैदान परिसरात तळ ठोकला. ते डासांची पर्वा न करता उघड्यावर झोपले होते. ’लोकमत’ने केलेल्या पाहणीत तरुणांचे हाल होत असल्याचे चित्र समोर आले.

पिंपरी-चिंचवडपोलिस आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर शहरात पहिल्यांदाच पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यापूर्वी झालेल्या भरतीसाठी पुणे शहरात ही प्रक्रिया पार पडली होती. शहरात पहिल्यांदाच ती होत असल्याने पिंपरी-चिंचवड पोलिस दल आणि शहरवासीयांना उत्सुकता आहे. या प्रक्रियेसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जय्यत तयारी केल्याचे सांगण्यात आले.

भरतीसाठी बहुतांश तरुण एक दिवस आधीच मैदानाबाहेर येऊन थांबले होते. रस्त्याच्या कडेला पदपथावर मिळेल तेथे बसले होते. तेथे डासांचा उपद्रव होता. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. स्वच्छतागृह नसल्याने अनेकांना शौचास तसेच लघुशंकेसाठी गैरसोयीचा सामना करावा लागला. दरम्यान, सायंकाळी काही तरुण मैदान परिसरात असलेल्या मंदिरात गेले. तेथे त्यांनी आसरा घेतला. काही तरुण घरगुती जेवणाच्या शोधात खानावळ शोधत होते, तर काहीजणांनी वडापाव खाऊन कशीबशी भूक मिटवण्याचा प्रयत्न केला.

कशीबशी रात्र घालवून पहाटे चारपासून मैदानात

भरतीसाठी आलेले काही तरुण म्हणाले, आम्हाला पहाटे चारच्या सुमारास मैदानावर जायचे आहे. मात्र, तोपर्यंत कशीबशी रात्र घालवावी लागणार आहे. शहरात मुक्कामाची व्यवस्था नाही. पहाटे मैदानापर्यंत येण्यासाठी वाहन मिळणार नाही. त्यामुळे शहरात इतरत्र मुक्काम न करता थेट मैदानाबाहेर मिळेल त्या जागेत रात्र घालवणार आहे. रात्री दहानंतर फिरते स्वच्छतागृह उपलब्ध होणार असल्याचे काहीजणांनी सांगितले.

शारीरिक चाचणीवर परिणाम?

तरुणांना रात्रभर जागरण करावे लागणार आहे. स्वच्छतागृह, स्नानगृह नसल्याने त्यांची गैरसोय होणार आहे. पुरेसे जेवण नाही, रात्रीची अपुरी झोप, त्यात पावसाचे दिवस याचा त्यांच्या शारीरिक चाचणीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही काही तरुणांनी सांगितले.

दोन आठवडे चालणार प्रक्रिया

भोसरीतील इंद्रायणीनगर येथील मैदानात दि. १९ जून ते १० जुलै दरम्यान १६ दिवस पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे हे १६ दिवस राज्यांतील विविध जिल्ह्यांतील शेकडो तरुण दररोज मैदान परिसरात मुक्कामी येणार आहेत. दररोज नव्याने येणाऱ्या या तरुणांना त्याच-त्या समस्यांचा सामना करावा लागणार असल्याचे पहिल्याच दिवशी दिसून आले.

प्रशासन ढिम्म

भरतीसाठी आलेल्या तरुणांना मैदानाबाहेर थांबण्यासाठी पुरेशी व्यवस्था करून देणे आवश्यक आहे. स्वच्छतागृह व स्नानगृह उपलब्ध करून दिले पाहिजे. मात्र, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे भावी पोलिसांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.

पोलिस भरतीसाठी तरुण मोठी मेहनत घेतात. भरतीसाठी ते मुक्कामी येतात. त्यांची गैरसोय टाळली पाहिजे. त्यासाठी सामाजिक संस्था, संघटनांनी पुढे आले पाहिजे. मंडप, पिण्याचे पाणी, जेवणाची व्यवस्था करून दिल्यास या तरुणांना दिलासा मिळेल.

- शंकर हुरसाळे, प्रशिक्षक, सोमाटणे (मावळ)

Web Title: Night in the open, no toilet, no bathroom! Disadvantage of youths who come for police recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.