ती काळरात्रच - १२ जुलै १९६१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:08 AM2021-07-12T04:08:51+5:302021-07-12T04:08:51+5:30
प्रलयासारख्या महाभयंकर नदीचे हे रौद्र रूप न विसरण्यासारखे आहे पुणेकरांकरिता. एक ना अनेक असे साथीचे रोग वाढण्याची पण भीती ...
प्रलयासारख्या महाभयंकर नदीचे हे रौद्र रूप न विसरण्यासारखे आहे पुणेकरांकरिता. एक ना अनेक असे साथीचे रोग वाढण्याची पण भीती ह्या वेळेस होती. त्यासोबत पुणेकरांना परत शुद्ध पाणीपुरवठा करणे हेही तितकेच गरजेचे होते. हा प्रमुख प्रश्न त्या वेळी पुणे महानगरपालिकेसमोर होता. या काळात माझे आजोबा कै. उमाकांत जगन्नाथ महाशब्दे वॉटर सप्लाय डिपार्टमेंटमध्ये काम पाहत होते. त्यांनी पुणे कॉपोर्रेशनमध्ये १९४९ ते १९७५ ह्या कालावधीत पाणीपुरवठ्याचे काम पहिले.
१९६१ साली जेव्हा पूर आला तेव्हा पुण्याला शुद्ध पाणीपुरवठा व्हावा म्हणून त्यांनी खूप कष्ट घेतले आणि त्या परिस्थितीतसुद्धा पुणेकरांना शुद्ध पाणी मिळायला लागले. त्या काळच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना विशेष रेल्वेचा पास देऊन मंत्रालयात बोलवून घेतले होते. त्याकाळी आजच्याप्रमाणे प्रगत तंत्रज्ञान नव्हते. त्यांना मंत्रालयातून तार पाठवून बोलाविण्यात आले होते. विरोधी पक्षातले लोक आरोप-प्रत्यारोप करत होते तेव्हा उमाकांत महाशब्दे (आजोबा) तिथे उपस्थित झाले. माननीयांनी प्रश्न विचारताच त्यांना सक्षम उत्तर द्यायला माझे आजोबा तयार होते. विरोधकांना हवी असलेली उत्तरे त्यांना आजोबांच्या तिथल्या उपस्थितीमुळेच मिळाली, असे आजोबांनी पानशेत आठवणी सांगताना मला सांगितले.
माझ्या आजोबांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यात योगदान दिले. नुसते सुरळीत नाही तर शुद्ध पाणी पुणेकरांना देण्याचे मोठे काम केले. त्यामुळे पुढील रोगराई झाली नाही.
आज या घटनेला ६० वर्षे पूर्ण होत असताना पुन्हा त्या सर्व गोष्टी मी जणू आजोबांकडून ताजेतवाने होऊन ऐकतोय, असे जाणवत आहे.
- शैलेश जगदीश महाशब्दे (नातू)