बाणेर बालेवाडीतही रंगतेय काेरेगाव पार्कचं ‘नाइटलाइफ’; पब, बारच्या परवानगीवर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 09:41 AM2024-05-23T09:41:37+5:302024-05-23T09:45:01+5:30
पुण्याच्या पश्चिम भागातील बाणेर, बालेवाडी, हिंजवडी तसेच पुणे-मुंबई महामार्गावरील नाइटलाइफ चांगलीच फोफावली आहे....
पुणे : शहरी भागातील विशेष कॅम्प, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क, कोंढवा परिसरातील पब, बारवर आलेली बंदी, नाइटलाइफमध्ये पोलिसांकडून होणारी अधूनमधूनची नाकाबंदी यापेक्षा उपनगरातील पबला मोठी पसंती तरुणाई देऊ लागली आहे. पुण्याच्या पश्चिम भागातील बाणेर, बालेवाडी, हिंजवडी तसेच पुणे-मुंबई महामार्गावरील नाइटलाइफ चांगलीच फोफावली आहे.
कल्याणीनगर येथील रविवारी झालेल्या अपघातानंतर पोलिस यंत्रणा, राजकीय पक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग जागा झाला. कल्याणीनगर परिसरात गेल्या दोन दिवसांमध्ये पब, रेस्टाॅरंटवर कारवाई सुरू झाली. जागोजागी नाकाबंदीही लावली गेली. पण शहरी भागाव्यतिरिक्त उपनगरांमध्ये फोफावलेल्या या नव्या झिंगाट संस्कृतीला आवर घालणे जरुरीचे झाले आहे.
पहाटेपर्यंत झिंगणाऱ्या तरुणाईला अडवणार कधी?
बाणेर-बालेवाडी, हिंजवडी आय.टी.पार्क परिसरात रात्री उशिरापर्यंत सर्रासपणे सुरू असणारे हॉटेल व पब यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण- तरुणी येत असतात. मध्यरात्री काय पण पहाटेपर्यंत सुरू असणाऱ्या या हॉटेल पबवर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. इमारतीच्या टेरेसवर (रूफ टॉप) मोठमोठ्या आवाजात सुरू असलेला डी.जे.चा आवाज व त्यावर धुंद होऊन नाचणारी तरूणाई ही या भागात मध्यरात्री घरी जाताना हालत-डुलत चालत असल्याचे चित्र नेहमीच पाहण्यास मिळते.
डीजे आवाजाची वाढली डाेकेदुखी
आय-टी क्षेत्रातील बक्कल पगार, परिसरातील श्रीमंत घरातील मुले-मुली, शिक्षणासाठी वास्तव्यास असलेले पीजीमधील मुले-मुली यांचा या भागात मोठा वापर पाहण्यास मिळतो. दरम्यान या भागातील अनेक पब व हॉटेलमधील डी.जे. चा आवाज हा परिसरातील नागरिकांना मात्र डोकेदुखी ठरली आहे.
बाणेर बालेवाडी भागात रात्री उशिरापर्यंत चालणारे पब, रेस्टॅारंट असून, त्यांच्या परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यावर गाड्या पार्क केल्यामुळे वाहतुकीला अडथळा येत आहे. यावर नियंत्रण आणणे जरूरी आहे.
सुदर्शन जगदाळे, आम आदमी पार्टी, बालेवाडी.
बालेवाडी येथील हायस्ट्रीटवर मध्यरात्रीनंतरही तरुणांचा गोंधळ सुरू असतो. तरुणांचे टोळके रात्री-अपरात्री सिगारेट ओढत मोठमोठ्याने बोलत गोंधळ घालतात. याचा येथील नागरिकांना खूप त्रास होतो.
रेखा कश्यप, रहिवाशी बालेवाडी.
बाणेर, बालेवाडी भागातील उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या हॉटेल, पब रेस्टॅारंटची पोलिस कर्मचारी पेट्रोलिंग करून वेळेत हे हॉटेल बंद करण्याचे आदेश देतात. या भागातील पब व बार वेळेचे बंधन पाळत आहेत.
- बाबासाहेब झरेकर, पोलिस निरीक्षक, बालेवाडी पोलिस चौकी.