बेघरांना रात्र निवाऱ्यांचा आधार

By admin | Published: July 6, 2016 03:28 AM2016-07-06T03:28:30+5:302016-07-06T03:28:30+5:30

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिकेने सुरू केलेल्या बेघरांसाठीचे रात्र निवारे (नाईट शेल्टर) बेघरांसाठी मोलाचा आधार ठरत आहेत. मात्र, अनेकांना आवश्यकता असूनही

Night shelters for homeless people | बेघरांना रात्र निवाऱ्यांचा आधार

बेघरांना रात्र निवाऱ्यांचा आधार

Next

पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिकेने सुरू केलेल्या बेघरांसाठीचे रात्र निवारे (नाईट शेल्टर) बेघरांसाठी मोलाचा आधार ठरत आहेत. मात्र, अनेकांना आवश्यकता असूनही केवळ नियमांची आडकाठी आणि व्यसनांमुळे अनेकांना भर पावसात शहरात मिळेल तिथे रात्र काढावी लागत असल्याचेही या पाहणीतून समोर आले. यात प्रामुख्याने दिवसभर रस्त्यावर, तसेच गर्दीच्या ठिकाणी विविध वस्तू विकून पोट भरणाऱ्यांचा समावेश आहे. जवळ असलेले साहित्य, तसेच रात्री दारू घेण्यामुळे या बेघरांना या शेल्टरची दारे महापालिकेकडून बंद करण्यात आली आहे.
शहरात बाहेरून येणाऱ्या, तसेच रस्त्यांवर झोपणाऱ्यांसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिकेने शहरात येरवडा भाजी मंडई, बोपोडीसह सेनादत्त पोलीस चौकी आणि पुणे स्टेशनसमोरील मोलेदिना पार्किंग प्लाझा या ठिकाणी ही निवाऱ्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. त्यातील सेनादत्त सांस्कृतिक हॉल, नवी पेठ व मोलेदिना पार्किंग प्लाझा पुणे स्टेशन या ठिकाणी असलेल्या रात्र निवाऱ्यांची पाहणी केली. सेनादत्त सांस्कृतिक हॉल येथील रात्र निवाऱ्यात सोमवारी ९ लोक राहण्यास होते. यामध्ये कामासाठी पुण्यात आलेले लोक, कामगार, वयोवृद्ध अशी लोकं वास्तव्यास होती. तर, पुणे स्टेशन येथील रात्र निवाऱ्यात २८ लोकं वास्तव्यास होती. यामध्ये वाढपी म्हणून काम करणारे, महाविद्यालयीन प्रवेशासाठी व सैन्यदलात भरतीसाठी आलेले तरुण, एक दिवसाच्या कामासाठी आलेले नागरिक व प्रवासी होते. ४० ते ५० लोक या निवाऱ्यांमध्ये एकावेळी राहू शकतात. सेनादत्त सांस्कृतिक हॉल येथील महिलासाठींचा हॉल महिला वास्तव्यास नसल्याने बंद होता. तर, पुणे स्टेशन येथील हॉलचीही अशीच स्थिती असल्याचे दिसून आले.
या रात्र निवाऱ्यांमध्ये संध्याकाळी ७ नंतर प्रवेश दिला जातो. आलेल्या व्यक्तीची पूर्ण माहिती नोंदवली जाते; तसेच त्यांच्या सामानाची तपासणी केली जाते. पांघरुण, उशी, गादी पालिकेकडून पुरवल्या जातात. प्रत्येकाला स्वतंत्र कपाटाची व्यवस्था सुद्धा येथे आहे. सकाळी ७ च्या दरम्यान सर्वांना एकत्रच बाहेर सोडले जाते. जेणेकरून कोणी कोण्याच्या सामानाची चोरी केली असल्यास ते निदर्शनास येते. पोलिसांकडून वेळोवेळी या निवाऱ्यांची तपासणी केली जाते; तसेच वास्तव्यास असलेल्या लोकांची माहिता घेतली जाते. बाहेरगावच्या नागरिकांसाठी निवारे उपयुक्त ठरत आहेत.

शहरात स्टेशन परिसर, तसेच लोकांची जेथे वर्दळ असते त्या ठिकाणी रात्रनिवास केंद्रांची माहिती देणारे फलक लावण्याची गरज आहे. शहरात अशा ठिकाणी पुरेसे फलक दिसत नाहीत. त्यामुळे या निवाऱ्यांची माहिती नसल्याने अनेक ठिकाणी बाहेर गावाहून येणारे नागरिक रस्त्यावरच रात्र काढत असल्याचे चित्र आहे.

नावे सांगताना गोंधळ : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांची सोय
सेनादत्त सांस्कृतिक हॉल, नवी पेठ येथील रात्र निवारा केंद्रात कामगार मुलांना त्यांची नावे विचारली असता, त्यांच्यात
कुजबुज चालू झाली. त्यांना नावे सांगताना कामगाराचे
नाव व कामाचा हुद्दा सांगताना गोंधळ उडाला.
स्विपरचे नाव व सफाई कामगाराचे नाव सांगताना एक व्यक्ती व दोन नावे, असा गोंधळ त्यांच्यात उडाला. त्यामुळे काम करणाऱ्या मूळ कामगारांच्या जागी इतर कोणी काम करीत असल्याची शक्यता आहे.
रात्र निवारा केंद्रात काम करणारे वार्डन, सफाई कामगार इ. मुले ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारी बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत, असे पाहणीत आढळून आले. ही मुले अभ्यास सांभाळून येथे काम करतात. या कामामधून त्यांना महिन्याला आठ ते दहा हजार रुपये पगार मिळतो. त्यामुळे त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास त्यांना ही मदत होते.

व्यसनाधीनतेमुळे अनेक जण बाहेर
कोणत्याही प्रकारचे व्यसन करून आल्यास या निवाऱ्यांमध्ये प्रवेश नाकारला जातो. सहसा स्थानिक नागरिकांना प्रवेश दिला जात नाही. स्वच्छता व शांतता राखणं येथे बंधनकारक आहे. रोगी असो की भिक्षेकरी प्रत्येकाला प्रवेश देणं बंधनकारक आहे. अनेक वेळा सर्व्हे करून पदपथांवर राहणाऱ्या लोकांना येथे आणले जाते; मात्र बहुतांश लोक येण्यास नकार देतात. पदपथावर राहिल्यास आम्हाला लोक अन्न देतील, अशी सबब सांगून रस्त्यावरील लोक येथे राहण्यास येत नाहीत. या निवाऱ्यांमध्ये फक्त राहण्याची सोय आहे. रस्त्यावर राहणारे लोग तेथेच स्वयंपाक करत असल्याने त्या वस्तू नेहमी हलवणं शक्य नसल्याने ते या निवाऱ्यांचा लाभ घेत नाहीत. तसेच पुरुष व महिलांसाठी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहावे लागत असल्याने विवाहीत जोडपी येथे येत नाहीत.

विविध संस्थांना ही रात्र निवारे चालवण्यास दिली आहेत. त्याच्यांकडून कर्मचाऱ्यांची नेमणूक येथे केली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे बहुतांश तरुण येथे वॉर्डन म्हणून काम करतात. दिवसा हे निवारे बंद असतात. येथे रखवालदारांची नेमणूक करण्यात आली आहे. सहसा ज्या भागात त्या व्यक्तीचे काम असेल त्या भागाच्या जवळील रात्र निवाऱ्याची माहिती त्या व्यक्तीला दिली जाते व त्या ठिकाणी पाठवले जाते. स्वच्छता व चांगली सोय या निवाऱ्यांमध्ये असल्याने अनेक गरजू लोक याचा वापर करीत आहेत. एका दिवसाच्या कामासाठी आलेल्या लोकांना व वयोवृद्धांना या निवाऱ्यांचा फायदा होत आहे. अनेकांनी चांगली सोय असल्याचेही आवर्जून नमूद केले.

मोलेदिना पार्किंग येथील रात्र निवारा केंद्राबाहेरच काही बेघर झोपलेले आढळले. यासंबंधी तेथील वार्डनला विचारले असता, तो म्हणाला, की व्यसनी लोकांना रात्र निवारा केंद्रात परवानगी नाही. त्यामुळे हे लोक येथे झोपायला येत नाहीत. तसेच काही लोक म्हणतात, की आम्ही बाहेर राहिलो नाही, तर आम्हाला जेवण कोण देणार. बाहेर झोपतो म्हणून येणारे जाणारे लोक आम्हाला जेवण देतात. त्यामुळे आम्हाला नाईट शेल्टर नको, असे हे नागरिक स्पष्टपणे सांगतात.

महिलांसाठी रात्र निवारा केंद्रात राहायला परवानगी नाही; कारण पुणे स्टेशन परिसरात वेश्याव्यवसाय चालतो. त्यामुळे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी मोलेदिना पार्किंग येथील रात्र निवारा केंद्रात महिलांना परवानगी देऊ नये, असे तेथील वार्डनने सांगितले. तसेच परिसरातील बेघर कुटुंबातील महिला व पुरूष वेगवेगळे राहायला तयार नसतात. त्यामुळे हे लोक निवारा केंद्रात फिरकत नाहीत.

मला दोन मुले आहेत. परंतु, मुले सांभाळ करीत नसल्यामुळे ते व त्यांची पत्नी बाहेरच राहतात. त्यांची पत्नी एका खासगी दवाखान्यात काम करते. आजोबा दिवसभर मंदिरामध्ये राहतात व रात्री निवाऱ्याला येथील रात्र निवारा केंद्रात येतात. रात्र निवारा केंद्रात कायमस्वरूपी राहायची सोय नसली, तरी वय जास्त असल्यामुळे येथील वार्डन मला रोज रात्री राहायला परवानगी देतो.
- एक ज्येष्ठ नागरिक

मी कोल्हापूरचा मार्केट रिसर्च सर्व्हेकरिता नेहमी पुण्याला येतो. डेक्कन परिसरात रात्र निवारा केंद्राचा फलक पाहिला व येथे आलो. येथे राहायची उत्तम आणि मोफत सोय असल्याने आठवड्यातून तीन-चार वेळा आलो, तर येथेच निवासाला असतो. येथे साहित्य ठेवायला स्वतंत्र कपाट दिले जाते. त्यामुळे साहित्य ठेवायला अडचण येत नाही.
- महेश संत

मी मूळचा सांगलीचा आहे. कामाच्या शोधात पुण्यात आलो. पुण्यात दिवसभर मजुरी करतो. येथे राहायची कोणतीही सोय नाही. त्यामुळे रात्र निवारा केंद्रात आठवड्यातून दोन दिवस राहतो. इतर दिवशी स्टेशनवर राहतो. येथे दररोज राहायला परवानगी नसते.त्यामुळे इतर दिवशी बाहेर आसरा शोधावा लागतो.
- शाकीर अहमद खान

मी मालेगावचा आहे. सैन्य भरतीच्या मेडिकलसाठी पुण्यात आलो. मित्रामुळे रात्र निवारा केंद्राची माहिती मिळाली. रात्री बाहेर २५० त े५०० रूपये द्यावे लागतात. तेवढी एपत नसल्यामुळे येथे निवासासाठी थांबलो आहे. येथील सुविधा उत्तम आहेत.
- चेतन गायकवाड
---------------
टीम लोकमत : राहुल गायकवाड, प्रदीप माळी, अनिरुद्ध करमरकर

Web Title: Night shelters for homeless people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.