खेड पोलिसांची धडक कारवाई; छापा मारून नष्ट केले गावठी दारू बनविण्याचे कच्चे रसायन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 12:48 PM2021-10-08T12:48:37+5:302021-10-08T12:54:51+5:30
खेड पोलिसांनी हातभट्टयांवर धडक कारवाई करीत खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा येथील काळेवस्ती परीसरारातील हातभट्टी उद्धवस्त केली. एकोनतीस हजार रूपायांचा हातभट्टी दारूचा माल पोलिसांनी या कारवाईत उद्धवस्त केला. पोलिस येण्याची चाहूल लागताच हातभट्टी चालक झाडाझुडपांच्या आडून पसार झाला.
राजगुरुनगर (पुणे): निमगाव ( ता. खेड ) येथे २९ हजार रुपयांचे गावठी हात भट्टीचे दारू बनविण्याचे कच्चे रसायन खेडपोलिसांनी छापा मारून नष्ट केले. याबाबत आरोपी शिवा राजाराम राजपुत, रा. काळेवस्ती, निमगाव, ( ता.खेड ) यांच्यावर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
निमगाव काळे वस्ती येथे डोंगराच्या जंगल परिसरात ओढयाच्या कडेला राजपुत हा हातभट्टी लावून गावठी दारूची निर्मिती करित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस हवालदार मोहन अवघडे, सचिन गिलबिले यांनी धाड टाकली. या धाडीत अंदाजे १४०० लिटर गावठी हात भट्टीचे गावठी दारू बनविण्याचे कच्चे रसायन त्यामध्ये गुळाचे खडे व झाडाच्या साली असलेले व लाकडी सरपण मिळून आले.
राजपुत हा कच्चे रसायन ढवळीत असताना दिसून आला. मात्र पोलीसांची चाहूल लागताच तो पळून गेला. त्यानंतर हे सर्व रसायन पोलिसांनी नष्ट केले. एकूण २९ हजार रूपये किंमतीचे गावठी हातभटटी् दारू बनविण्याचे साधने मिळून आली. पोलिस हवालदार मोहन अवघडे यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास सचिन गिलबिले करीत आहे.