इंदापूरातील निमगांव - केतकीत लांडग्यांच्या कळपाचा शेळ्यांवर हल्ला; लहान ९ पिल्ले जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 06:57 PM2021-06-18T18:57:13+5:302021-06-18T18:57:20+5:30
मेंढपाळाचे सुमारे पावणे दोन लाखाहून अधिक नुकसान
निमगाव केतकी: निमगांव केतकी येथील कचरवाडी गावात लांडग्याच्या कळपाने अचानक शेतकऱ्याच्या शेळ्यांवर हल्ला चढवत त्यांची ९ लहान पिल्ले जागीच ठार केली. तसेच, तर ९ पिल्ले पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी मध्यरात्री घडला.
या मध्ये माणिक दत्तु कचरे या मेंढपाळाचे सुमारे पावणे दोन लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच सरपंच कुंडलिक कचरे यांनी वन विभागाला कळवले. इंदापूर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्या सूचनेनुसार सर्व घटनेचा पंचानामा केला.
सरपंच कचरे यांनी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना ही माहिती दिली आहे. भरणे यांनी याची दखल घेत कचरे यांना तातडीने मदत देण्याची ग्वाही दिली. या घटनेत कचरे यांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांना शासनाच्या वतीने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
वन्यप्राण्यांचे हल्ले टाळण्यासाठी मेंढपाळ व शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पावसाळ्यात काळजी घ्यावी. आपल्या पाळीव जनावरांना बंदिस्त व सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.