भरदिवसा राजगुरुनगरमध्ये घराचे कुलूप तोडून साडे नऊ लाखांची चोरी; दागिन्यांसह रोख रक्कम लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 19:40 IST2022-01-17T19:07:57+5:302022-01-17T19:40:48+5:30
दागिने व रोख रक्कम असा साडेनऊ लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविला...

भरदिवसा राजगुरुनगरमध्ये घराचे कुलूप तोडून साडे नऊ लाखांची चोरी; दागिन्यांसह रोख रक्कम लंपास
राजगुरूनगर: बंद घराचे कुलुप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा साडेनऊ लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना तिन्हेवाडी रोड, राजगुरूनगर येथे घडली आहे. याबाबत अफसाना मोईन कुरेषी ( रा.साई व्हिला बिल्डींग, तिन्हेवाडी रोड राजगुरुनगर, ता. खेड ) यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी रविवारी दि. १६ रोजी दुपारच्या सुमारास बंद सदनिकेचे कुलुप तोडून घरात असलेल्या लाकडी कपाटाचे कुलूप तोडले. त्यामध्ये ठेवलेली रोख रक्कम दोन लाख सत्तर हजार रुपये, तसेच दोन लाख पंचवीस हजार रुपये किंमतीचे ५ तोळ्याचे सोन्याचे दागिने, ५६ हजार रुपये किंमतीचे सव्वा तोळे वजनाचे सोन्याचे मनी मंगळसुत्रासह इतर दागिने असा एकूण ९ लाख ५१ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुर्दशन पाटील, पोलिस निरिक्षक सतीश गुरव यांनी भेट दिली असुन चोरांच्या तपास करिता पथके करण्यात आली आहे.