‘आपली पीएमपी’ला नऊ लाख पुणेकरांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 19:20 IST2025-01-10T19:20:25+5:302025-01-10T19:20:44+5:30

प्रवाशांनी बस सेवेचा जास्तीत जास्त वापर करावा, प्रवास सोयीस्कर व्हावा आणि तिकीट खरेदीसाठी वेळेच्या व्यवस्थापनात सुलभता यावी, या उद्देशाने ॲप सुरू करण्यात आले.

Nine lakh Pune residents prefer 'Aapli PMP' | ‘आपली पीएमपी’ला नऊ लाख पुणेकरांची पसंती

‘आपली पीएमपी’ला नऊ लाख पुणेकरांची पसंती

पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपीएमएल)च्या आपली पीएमपी मोबाइल ॲपला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, ॲप डाऊनलोड्सची संख्या ९ लाखांवर पोहोचली आहे. प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचा सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित अनुभव देण्यासाठी रिअल-टाइम बस ट्रॅकिंग, रूट मार्गदर्शन, ऑनलाइन तिकीट बुकिंग आणि पास व्यवस्थापन यांसारख्या अत्याधुनिक सुविधा या ॲपद्वारे उपलब्ध आहेत. या माध्यमातून पीएमपीला दरमहा ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

पीएमपीने ऑगस्ट २०२४ मध्ये आपली पीएमपी ॲप सुरू केले होते. प्रवाशांनी बस सेवेचा जास्तीत जास्त वापर करावा, प्रवास सोयीस्कर व्हावा आणि तिकीट खरेदीसाठी वेळेच्या व्यवस्थापनात सुलभता यावी, या उद्देशाने ॲप सुरू करण्यात आले. गेल्या काही महिन्यांत ॲपला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

पीएमपीच्या एकूण दैनंदिन प्रवासी संख्येचा विचार करता, १० लाख प्रवाशांपैकी जवळपास ९० टक्के प्रवासी आता डिजिटल पद्धतीचा अवलंब करत आहेत. या ॲपद्वारे प्रवाशांना त्यांच्या बसच्या मार्ग, वेळापत्रक, थांबे याबाबत त्वरित माहिती मिळते, तसेच तिकीट खरेदी करणे अधिक सोपे झाले आहे. ॲपच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ३८ हजार प्रवाशांनी ॲप डाउनलोड केले होते, तर आता सहा महिन्यात ही संख्या नऊ लाखांवर पोहोचली आहे.

ॲपमध्ये कोणकोणत्या सुविधा :

- प्रवासी थांबलेल्या ठिकाणावरून इच्छित स्थळाची बसमार्गाची माहिती मिळते.

- मोबाईल ॲपमधून प्रवाशांना आपल्या बसचे ‘लाइव्ह लोकेशन’ समजणार. त्यामुळे बस थांब्यावर बस किती वेळात येणार हे समजेल.

- प्रवाशांना ॲपवरून यूपीआयचा वापर करून तिकीट बुक करता येईल.

- प्रवाशांना दैनंदिन पास काढण्याची सुविधा देखील ॲपमध्ये उपलब्ध करून दिली आहे. प्रवाशांना ४०, ५० आणि १२० रुपयांचे पास काढता येते.

- ‘पीएमपी’विषयी प्रवाशांना काही तक्रार असेल तर ते ॲपवर नोंदविता येणार.

ऑनलाइन तिकीट खरेदीत झालेली वाढ ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. प्रवाशांसाठी डिजिटल सुविधा अधिक सुलभ केल्यामुळे त्यांचा वेळ व पैसे वाचत आहेत. शिवाय, ‘यूपीआय’ व इतर डिजिटल पद्धतींद्वारे तिकीट काढण्याची सुविधा प्रवाशांना अधिक सोयीस्कर वाटत आहे.  - सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी

Web Title: Nine lakh Pune residents prefer 'Aapli PMP'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.