सीएनजी प्रकल्पासाठी नऊ ठिकाणी जागा
By admin | Published: January 11, 2017 03:57 AM2017-01-11T03:57:22+5:302017-01-11T03:57:22+5:30
महापालिकेच्या ९ जागांवर सीएनजी गॅस प्रकल्प उभारण्यासाठी जागा देण्यास मंगळवारी स्थायी समितीकडून मंजुरी देण्यात आली.
पुणे : महापालिकेच्या ९ जागांवर सीएनजी गॅस प्रकल्प उभारण्यासाठी जागा देण्यास मंगळवारी स्थायी समितीकडून मंजुरी देण्यात आली. यामुळे सीएनजीवरील वाहनांना सीएनजीचा सुरळीत पुरवठा होण्यास मदत होणार आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमार्फत पुणे शहर परिसरात सीएनजी गॅस पुरविण्यासाठी सीएनजी गॅस डिस्ट्रीब्युशन प्रोजेक्ट स्थापना करण्यात आली आहे. या जागा ३० वर्षांच्या भाडेकराराने देण्यास मंजुरी दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी दिली.
खराडी, बावधन (दोन जागा), बालेवाडी (दोन जागा), बाणेर (दोन जागा) आणि कोथरूड येथील एक अॅमेनिटी स्पेसच्या जागा एमएनजीएलला सीएनजी स्टेशनसाठी देण्यात येणार आहेत. या जागांच्या बदल्यात महापालिकेला वर्षाकाठी १ कोटी ७२ लाख रुपयांचे भाडे प्राप्त होणार आहे. (प्रतिनिधी)
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात सीएनजी गॅस प्रकल्प सुरू झाल्यास, त्याचा लाभ सार्वजनिक तसेच खासगी वाहनासाठी
होणार आहे.
तसेच पुणे शहरातील प्रदूषण कमी होण्यासही मदत होणार आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांनी सीएनजी स्टेशनसाठी पुणे महानगरपाल्आिकेच्या ताब्यातील अॅमिनिटी स्पेसची (सुविधा क्षेत्राची) मागणी केली आहे.
शहरात सीएनजी स्टेशन वाढल्यास शहरात सीएनजी इंधनवर चालणाऱ्या वाहनांची संख्याही वाढणार आहे. तसेच गॅसवर १.२० रुपये सबसिडी देण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे.