ध्वज फडकवल्याने नऊ महिन्यांची सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 05:04 AM2017-10-03T05:04:39+5:302017-10-03T05:04:42+5:30
इंग्रज राजवटीचा काळ जुलमी होता. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात ब्रिटिश सरकारविरोधी प्रचार केल्याबद्दल, भारताचा ध्वज फडकवल्याबद्दल त्यांना नऊ महिन्यांची सक्तमजुरी व १०० रुपये दंडाची शिक्षा झाली होती.
निरवांगी : इंग्रज राजवटीचा काळ जुलमी होता. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात ब्रिटिश सरकारविरोधी प्रचार केल्याबद्दल, भारताचा ध्वज फडकवल्याबद्दल त्यांना नऊ महिन्यांची सक्तमजुरी व १०० रुपये दंडाची शिक्षा झाली होती. दंड न भरण्यास नकार दिल्यामुळे माझ्या घरातील साहित्य जप्त करण्यात आले होते व त्याचा लिलाव करून दंड वसूल केला, असे भारत छोडो आंदोलनात इंग्रजांविरोधात सत्याग्रह केलेले स्वातंत्र्यसैनिक रघुनाथ रामचंद्र माने गुरुजी यांनी सांगितले.
कळंब (ता. इंदापूर) येथे ‘भारत छोडो आंदोलनात माझे योगदान’ या विषयावर इतिहास विभागाच्या वतीने महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. अंकुशराव आहेर यांनी प्रास्ताविक केले.
इतिहास विभागाचे
प्रमुख प्राध्यापक हमीद उमरअली काझी यांनी स्वतंत्र सैनिक रघुनाथ रामचंद्र माने गुरूजी यांचा परिचय करून दिला.
या वेळी माने गुरूजी यांनी इंग्रज राजवटीत आलेले अनुभव सांगितले. हे अनुभव कथन करताना ते अत्यंत भावुक झाले होते. त्याने उपस्थित श्रोत्यांच्या अंगावर शहारे आणणारे अनुभव होते.
या वेळी प्रा. ज्ञानेश्वर गुळीक व विद्या गुळीक यांनी देशभक्तीपर गीत सादर महाविद्यालयच्या वतीने माने गुरुजी यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष हणमंतराव मोरे, खजिनदार हणमंतराव रणसिग, विश्वस्त शिवाजी रणवरे, प्रकाश कदम, वीरसिंह रणसिग, कुलदीप हेगडे कार्यालय अधिक्षक शिवाजी कदम महाविद्यालय प्राध्यापक वर्ग कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी प्रा. हमीद उमरअली काझी व ज्ञानेश्वर गुळीक, विद्या गुळीक यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.
देशावर निष्ठा ठेवा; सौजन्याने वागा...
आपल्या दैनंदिन कार्याची नोंद ठेवा. कर्ज काढू नका, आपल्या देशावर निष्ठा ठेवा, इतरांशी सौजन्याने वागा, असा संदेश माने गुरुजींनी दिला. भारतमाता की जय, ही घोषणा त्यांनी स्पष्ट व खड्या आवाजात दिली. तेव्हा त्यांना उपस्थितांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने सभागृह दणाणले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस वीरसिंह रणसिंग यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.