नऊ शाळांच्या शिक्षकांचा पगार अडकला
By admin | Published: June 15, 2015 06:00 AM2015-06-15T06:00:14+5:302015-06-15T06:00:14+5:30
सन २०१५-१६ या नवीन शैक्षणिक वर्षाला उद्या दि. १५ पासून सुरुवात होत आहे. उद्यापासून सुटीनंतर शाळेचा पहिला दिवस गोड होणार असला,
जेजुरी : सन २०१५-१६ या नवीन शैक्षणिक वर्षाला उद्या दि. १५ पासून सुरुवात होत आहे. उद्यापासून सुटीनंतर शाळेचा पहिला दिवस गोड होणार असला, तरीही तालुक्यातील नऊ शाळांतील शिक्षकांचे नवे वर्ष पगाराविनाच सुरू होणार असल्याची चर्चा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात होत आहे.
तालुक्यातील वाळुंज केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या १३ शाळांपैकी ९ शाळांतील शिक्षकांचा एप्रिलचा पगारच झाला नाही. मे महिन्याचा पगारही होणार की नाही, अशीच चर्चा आहे. तालुक्यातील २२२ प्राथमिक शाळांचे पगार झाल्यानंतर त्यातील खळद, शिवरी, गोटेमाळ, रासकरमळा, कदमवस्ती, बेलसर, मठवाडी, भोंगळेमळा, तक्रारवाडी या नऊ शाळांचे पगार का झाले नाहीत, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबाबत पुरंदरच्या तत्कालीन प्रभारी गटशिक्षण अधिकारी नीलिमा बधे यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित शाळांकडून पगारबिले वेळेत न आल्याने असे घडल्याचे सांगण्यात आले. मुख्याध्यापकाकडून मात्र आम्ही पगारबिले वेळेतच पगारबिलाचे काम करणाऱ्या एका शिक्षकाकडे दिलेली होती; तरीही पगार का मिळाला नाही, याचेच आम्हालाही आश्चर्य वाटते, असे सांगण्यात येते. याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता वेगळेच सत्य समोर आले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून पगारबिले आॅनलाइन पद्धतीने काढण्यात येत आहे. मात्र, ही आॅनलाइन पद्धत अद्यापही तालुक्यातील सर्वच मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देऊनही समजलेली नाही. त्याचबरोबर अनेक शाळांतून आॅनलाइनसाठी नेटची रेंज नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत.
विशेष म्हणजे याच वाळूंज केंद्राच्या केंद्रप्रमुखांचा पगारही झालेला नसल्याचे समजले. केंद्र्रप्रमुख दिलीप राजगुरू यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सदर मोबदल्यावर काम करणाऱ्याने माझा पगारच चुकीचा काढल्याची तक्रार केली आहे. एकीकडे, शासन आॅनलाइन पद्धतीने शिक्षकांचा पगार देण्याचा प्रयत्न करते आहे. तर तीच आॅनलाइन पद्धत प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना अवगत नाही. यासाठी मोबदल्यावर माहीतगाराची अनधिकृत नेमणूक केली जाते. हीच शैक्षणिक क्षेत्राची शोकांतिका आहे.
(वार्ताहर)