लस न घेतलेल्या नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:12 AM2021-05-21T04:12:52+5:302021-05-21T04:12:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम करणाऱ्या अनेक सेवकांकडून लस घेण्यास अद्यापही टाळाटाळ केली जात असल्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम करणाऱ्या अनेक सेवकांकडून लस घेण्यास अद्यापही टाळाटाळ केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे़ त्यातच महापालिकेच्या ज्या १० फ्रंटलाइन वर्कर यांचा मृत्यू झाला होता, त्यापैकी ९ जणांनी लस घेतली नसल्याचे समोर आले आहे़ यामुळे पुणे महापालिकेने आपल्या फ्रंटलाइन वर्कर यांना तातडीने लस घेण्याचे आवाहन केले आहे़
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जीव गमवावा लागणाऱ्या कोरोनाबाधितांमध्ये महापालिकेच्या सेवेत असलेल्या दहा फ्रंटलाइन वर्कर पैकी ९ जणांनी लस घेतली नव्हती़ यापैकी सहा जणांना अन्य आजार होते, मात्र लस घेतली असती तर त्यांचे जीव वाचले असते असे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे़ परिणामी, ज्या फ्रंटलाइन वर्कर यांनी लस घेतली नाही त्यांनी लागलीच लस घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे़
पुणे शहरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी साधारणत: ८२ हजारांच्या पुढे फ्रंटलाइन वर्कर यांनी नावनोंदणी केली आहे़ यापैकी सुमारे ६७,७५३ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला असून,यापैकी २४,८४२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे़ परंतु अद्यापही अनेक जणांनी पहिला डोसही घेतलेला नाही़
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महापालिकेच्या १२७ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला़ यापैकी एकाचा मृत्यूही झाला होता़ पण मेच्या पहिल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांचा मृत्यूचा आकडा वाढला व आणखी ९ जणांचा मृत्यू झाला़ तेव्हा कामगार कल्याण विभागाकडून याबाबतची चौकशी केली असता, मृत्यू झालेल्यापैकी ९ कर्मचाऱ्यांनी लस घेतली नसल्याचे समोर आले आहे़ यामुळे पुन्हा एकदा सर्व फ्रंटलाइन वर्कर यांनी लस तातडीने घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे़
-----------------------------