Pune Crime: नऊ वर्षांच्या मुलीवर सहा महिने वारंवार लैंगिक अत्याचार; नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 07:34 PM2024-06-01T19:34:18+5:302024-06-01T19:34:57+5:30
दरम्यान, या प्रकरणात आरोपीने जामीन मिळण्यासाठी विशेष न्यायालयाकडे अर्ज केला होता. हा अर्ज फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली...
पुणे : अवघ्या नऊ वर्षांच्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप आणि ६५ हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी हा निकाल दिला. दंडाची रक्कम पीडित मुलीला भरपाई स्वरूपात देण्यात यावी, असे निकालात नमूद आहे.
दरम्यान, या प्रकरणात आरोपीने जामीन मिळण्यासाठी विशेष न्यायालयाकडे अर्ज केला होता. हा अर्ज फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. आरोपी व त्याच्या नातेवाइकांकडून तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांवर खटला मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याची बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आली. त्यामुळे उच्च न्यायालयाने या प्रकरणावर देखरेख ठेवून दररोज सुनावणी घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार न्यायालयाने दैनंदिन सुनावणी घेऊन एका महिन्यात निकाल दिला.
अजय किसन शेळके (२६) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. सहा महिन्यांपासून तो अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत होता. पीडितेने हा प्रकार आईला सांगितल्यावर १९ जुलै २०२१ रोजी पौड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तत्कालीन सहायक निरीक्षक व्ही. एन. देवकर यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरोधात बलात्कार, विनयभंग, धमकी तसेच लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) विविध कलमांनुसार आरोपपत्र दाखल केले.
विशेष सरकारी वकील विद्या विभुते यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. त्यांनी या खटल्यात सात साक्षीदार तपासले, तर बचाव पक्षाने दोन साक्षीदार तपासले. पीडित मुलगी व तिच्या आईची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीने केलेला गुन्हा क्रूर असून, त्याला कोणतीही दयामाया न दाखवता जास्तीत जास्त शिक्षा ठोठावण्यात यावी, त्यामुळे समाजात कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील विद्या विभुते यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.