पुणे जिल्ह्यातील तब्बल 90 टक्के तलाठी राहतात सजांच्या बाहेर; नागरिकांचे होतेय गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 10:32 AM2022-03-16T10:32:41+5:302022-03-16T10:52:17+5:30
सजांमध्ये न राहणा-या तलाठ्यांचे घरभाडे बंद करणार का याकडे लोकांचे लक्ष..
सुषमा नेहरकर- शिंदे
पुणे :पुणे जिल्ह्यात सध्या 548 तलाठी विविध ठिकाणी कार्यरत आहेत. परंतु यापैक 90 टक्क्यांपेक्षा अधिक तलाठी सजांच्या बाहेर म्हणजे पुण्यात किंवा तालुक्यांच्या ठिकाणी राहत असल्याची वस्तुस्थिती आहे. यामध्ये हवेली, खेड, शिरूर, मावळ, मुळशी, वेल्हा तालुक्यातील बहुतेक तलाठ्यांचा मुक्काम पुणे शहर, पिंपरी-चिंचवडमध्ये असल्याने गावात तलाठी आला नाही तर मी मिटींगमध्ये आहे, दुस-या गावात आहे अशीच उत्तरे सर्वसामान्य लोकांना ऐकायला मिळतात. यामुळे महसूल मंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे खरंच सजांमध्ये न राहणा-या तलाठ्यांचे घरभाडे बंद करणार का याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.
गावपातळीवर तलाठी हा महत्त्वाचा घटक असून अनेक सजांमध्ये तलाठी कार्यालयाजवळच त्यांचे निवासस्थान बांधण्यात आले आहे. राज्यातील सर्व तलाठ्यांना त्याच्या सजातच थांबण्याच्या सूचना असून यानंतरही जे तलाठी सजांमध्ये राहणार नाहीत, त्यांचे घरभाडे बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतेच विधानसभेत जाहिर केले.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तलाठी गावात हजर राहत नसल्याने गावातील लोकांनी तलाठी कार्यालयच बंद केल्याने याबाबत बोलताना यापुढे सर्व तलाठ्यांनी त्याच्या सजांमध्ये राहण्याचे आदेश दिले. पुणे जिल्ह्यात 548 तलाठी असून, यापैकी खूपच कमी तलाठी सजांमध्ये राहत असतील. महसूल मंत्र्यांच्या घोषणेची अंमलबजावणी पुण्यात होणार का असा सवाल लोकांनी उपस्थित केला आहे.
जिल्ह्यातील तलाठ्यांची प्रांतनिहाय संख्या-
पुणे शहर - शिरूर : 57, बारामती- इंदापूर : 86, मावळ-मुळशी : 75, खेड : 51, पुरंदर- दौंड: 85, जुन्नर- आंबेगाव: 55, भोर - वेल्हा : 59, हवेली : 56