पुण्यातील नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची कमाल; कोरोना काळात अद्ययावत माहिती देणाऱ्या 'जीव रक्षा' वेबपोर्टलची निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 04:51 PM2021-04-27T16:51:52+5:302021-04-27T17:04:44+5:30
विराजने मागच्या वर्षी म्हणजेच कोरोनाच्या पहिल्या लाटेत पुण्यातील नायडू आणि ससून रुग्णालयाला कोविड १९ रोबोट हा सेमी ऑटोमॅटिक यंत्रमानव (रोबो) बनवला होता.
पुणे : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनासह आपण सर्वच जण जास्तीत जास्त काळजी घेत आहोत. मात्र, तरीदेखील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. मात्र, या काळात माणुसकीची किंमत देखील अधोरेखित झाली आहे. तसेच चोहो बाजूंनी भेदरलेल्या कोरोना काळात मात्र सकारात्मक व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या करणाऱ्या अनेक घटना देखील समोर येत आहेत. पुण्यात नववीत शिकणाऱ्या मुलाने महत्वाची कामगिरी बजावत सर्व सामान्यांना कोरोना संबंधीची सर्व प्रकारची अधिकृत व अद्ययावत माहिती देणाऱ्या 'जीव रक्षा' या वेबसाईटची निर्मिती केली आहे.
पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव एकीकडे वाढत असताना दुसरीकडे कोरोना ग्रस्तांना उपचार यंत्रणेबाबत योग्य माहित मिळत नसल्याच्या देखील तक्रारी समोर येत आहे. पुणे महापालिकेने कोरोनाची माहिती देणारी हेल्पलाईन सुरु केली आहे मात्र त्याबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया फारच अनुकूल नाहीत.अशी स्थिती नाही. आधीच कोरोना रुग्णाचे कुटुंबीय हादरलेले असताना उपचार यंत्रणेतल्या गैरसोयी क्लेशदायक ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नववीत शिकणाऱ्या विराज राहुल शहा (वय १५) या विद्यार्थ्याने 'जीव रक्षा' या वेबसाईटची निर्मिती केली आहे. यासाठी त्याला जवळपास आठ ते दहा महिन्यांचा कालावधी लागला आहे.या निर्मितीच्या कामात त्याच्या संपूर्ण कुटुंबाची त्याला साथ लाभली. पुणे कोरोना रुग्णालय,,प्लाझ्मा, रक्तदान, पुणे महापालिका गृह विलगीकरण, नोंदणी संकेतस्थळ, ऑक्सिजनबाबतची माहिती, अत्यावश्यक सेवेतील वाहतूक सेवा यासर्व बाबीची तात्काळ माहिती मिळणार आहे. https://www.jeevan-raksha.com या संकेतस्थळावर आहे.
नववीत शिकणाऱ्या विराज शहाने कोरोनाविरुद्ध जनजागृती करण्याच्या उद्देशाने बनविलेल्या वेबसाईटचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या वेबसाईटवर कोरोनासंदर्भातील सर्व अपडेट माहिती मिळणार आहे. या वेबसाईटवर जागतिक आरोग्य संघटना, आयुष मंत्रालय,भारत सरकार तसेच पुणे महानगरपालिका यांची कोरोना संदर्भातील नियमावली, लसीकरण आणि पुण्यातील लसीकरण केंद्रांची नावे, सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था, रक्तपेढ्या, ऑक्सिजन संदर्भात कार्य करणाऱ्या संस्था, ऑक्सिमिटर कसे वापरावे, आरोग्यसेतू, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी डॉक्टरांचे सल्ले तसेच मार्गदर्शिका, होमिओपॅथी इत्यादीची वेगवेगळ्या स्रोतांमधून उपलब्ध असणारी महत्त्वाची माहिती तसेच व्हिडिओ या वेबसाईटवर संकलित करण्यात आले आहेत.
विराज म्हणाला, कोरोना संकट झाल्यापासूनच अभिनव उपक्रम राबवून समाजोपयोगी असे काहीतरी करण्याबाबत विचार सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून मागच्या वर्षी पुण्याच्या नायडू आणि ससून रुग्णालयाला कोविड १९ रोबोट हा सेमी ऑटोमॅटिक यंत्रमानव (रोबो) भेट दिला होता.
यावेळी मात्र, परिस्थिती वेगळी होती. माझ्या आईचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर संपूर्ण कुुटुंबाची फार धावपळ झाली. याच दरम्यान मला 'जीव रक्षा' वेबसाईटची संकल्पना सुचली. नंतर मग बाबा, आई, बहीण यांच्या साहाय्याने गेले काही महिने काम करून ही वेबसाईट वापरासाठी उपलब्ध करून दिली आहे. ही वेबसाईट हाताळायला फारच सोपी आणि सहज असून तिचा वापर कुणालाही शक्य आहे.