टवाळखोर मुलांच्या छेडछाडीला कंटाळून नववीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या; इंदापूरातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 04:15 PM2022-01-13T16:15:43+5:302022-01-13T16:16:50+5:30
मुलांच्या टवाळखोरी छेडछाडीला कंटाळून सिद्धीने बुधवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
बारामती : बोरी (ता. इंदापूर) येथील अल्पवयीन मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी (दि. १२) सायंकाळी ५ च्या दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी भवानीनगर पोलिस चौैकीमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धी गजानन भिटे (रा. बोरी, ता. इंदापूर) असे या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. सिद्धी बोरी गावातील हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती. या प्रकरणी गणेश संतोष कुचेकर, यश अरूण गरगडे व एक अल्पवयीन मुलगा या तिघांविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेत जात असताना गावातील तीन टवाळखोर मुले तिची छेड काढत असल्याची माहिती समोर आली आहे. मुलांच्या टवाळखोरी छेडछाडीला कंटाळून सिद्धीने बुधवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
आत्महत्येपूर्वी तिने मला माहित आहे माझं चुकतय, पण आई-वडिलांच्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून आत्महत्या करत असून गावातल्या 'आब्या' मुळे आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे. याप्रकरणी तिचे वडील गजानन भिटे यांनी भवानीनगर पोलिसांकडे तक्रार दिली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास फौजदार नितीन लकडे करत आहेत.