महाराष्ट्रीय बेंदूरनिमित्त नीरा बाजारपेठ फुलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:09 AM2021-07-21T04:09:36+5:302021-07-21T04:09:36+5:30
-- नीरा : महाराष्ट्रीय बेंदूर (बैलपोळा) सण गुरवारी होत आहे. सर्जा राजाच्या साजावटीच्या वस्तूंनी नीरेतील दुकाने फुलली आहेत. आपल्या ...
--
नीरा :
महाराष्ट्रीय बेंदूर (बैलपोळा) सण गुरवारी होत आहे. सर्जा राजाच्या साजावटीच्या वस्तूंनी नीरेतील दुकाने फुलली आहेत. आपल्या गाई, बैलाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी बळीराजाची आज लगबग दिसत आली. बाजारपेठेत सजावटीच्या वस्तूंची मागणी वाढली आहे. खरेदी निमित्त नीरा बाजारपेठ फुलली होती.
नीरा नदी काठच्या गावांमधून महाराष्ट्रीय बेंदूर सण साजरा केला जातो. वर्षभर आपल्या शेतात राबणाऱ्या बैलांच्या कष्टाचे कौतुक करण्याचा हा दिवस. गुरवारी बेंदूर साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून बैलांच्या साजावाटीच्या साहित्य खरेदीसाठी बाजार पेठेत गर्दी होताना दिसत होती. कोरोना संसर्गाच्या बाबत नियम पाळत व्यावसायिकांनी दुकाने सुरु ठेवली आहेत.
सध्या सजावटीच्या फॅन्सी वस्तूंना मोठी मागणी आहे. त्याच बरोबर सजावटीच्या व जनावरांसाठी वापराच्या रेडीमेड वस्तूंची मागणी जास्त आहे. पूर्वी सारख्या झुली, बाशिंगे याची मागणी कमी झाली आहे. पुढील काळात यावास्तूंच्या किंमती वाढतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
ज्यांच्या घरी बैलजोडी नाही असे शेतकरी, कष्टकरी, नोकरदार बाजारपेठेतून मातीची बैलजोड्या विकत घेतात. मातीच्या बैलजोडी आता आकर्षक पद्धतीने केल्या जात आहेत. त्यांचीही पूजा मनोभावे केली जाते. इतर दिवशी या बैलजोडी दिवाणखान्यात शोभेच्या वस्तू म्हणून ठेवल्या जात आहेत. तीस रुपयांपासून आठशे रुपयांपर्यंत दर असलेल्या बैलजोड्या सध्या नीरा बाजारपेठेत उपलब्ध आहेत. रंग, माती तसेच सजावट साहित्य महाग झाले असल्याने बैल जोडीच्या किंमतीत वाढ झाली असल्याचे माहिती नीरेतील कुंभार व्यावसायिक लक्ष्मण कुंभार यांनी दिली.
कोट
सध्या बैलांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे पूर्वी इतकी उलाढाल होत नाही. मात्र ज्यांच्याकडे आजही बैल जोडी किंवा गायी म्हशी आहेत त्यांचा उत्साह पूर्वी इतकाच आहे.
- सचिन शिंदे, व्यापारी
--
फोटो क्रमांक २० नीरा बेंदूर बाजारपेठ