पुरंदर तालुक्यातील नीरा प्राथमिक शाळा आजपासून बेमुदत बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 01:43 PM2019-08-01T13:43:00+5:302019-08-01T13:49:00+5:30
प्राथमिक शाळेसाठी मंजूर करण्यात आलेल्या तात्पुरत्या वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यास होत असलेल्या दिरंगाई व चालढकलीमुळे संतप्त झालेल्या पालकांनी हा निर्णय घेतला.
नीरा : नीरा (ता. पुरंदर) येथील प्राथमिक शाळेसाठी मंजूर करण्यात आलेल्या तात्पुरत्या वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यास होत असलेल्या दिरंगाई व चालढकलीमुळे संतप्त झालेल्या पालकांनी उद्या (दि. १ ऑगस्ट) पासून आपल्या मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात १७ जुलै रोजी व्यवस्थापन कमिटीने ठराव केला होता. त्या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासन व पंचायत समिती यांना कळविण्यात आले होते. मात्र, यावर कोणताच तोडगा न निघाल्याने उद्यापासून पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळा नं. १ मुलांची व २ मुलींची अशा दोन शाळा आहेत. या दोन्ही शाळा एकाच इमारतीत भरत होत्या. मात्र, ही इमारत मोडकळीस आली असून व्यवस्थापन समितीने आपल्या जबाबदारीवर इथे शाळा भरवावी, असा अहवाल कार्यकारी अभियंत्याने गेल्या वर्षी दिला. त्यानंतर तात्पुरती सोय म्हणून दोन महिन्यांसाठी ही शाळा नीरा येथील रयत शिक्षण संस्थेच्या इमारतीत विभागून बसवण्यात आली होती. मे महिन्यात यावर उपाययोजना करून नवीन इमारत होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात इराकॉन पॅनलच्या वर्गखोल्या बांधण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांनी दिले होते. त्यानुसार ३३ लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. या संदर्भात निविदा प्रसिद्ध होऊन कामाची वर्कऑर्डरही देण्यात आली आहे. मात्र, ऐन वेळी रयत शिक्षण संस्थेने त्यांच्या आवारात तात्पुरत्या वर्गखोल्या बांधण्यास परवानगी नाकारली. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या मालकीच्या बाजारतळावर बांधकामाला परवानगी मिळावी म्हणून पालकांनी मागणी केली. मात्र, ग्रामपंचायतीने त्याला नकार दिला. एका खासगी व्यक्तीने दोन वर्षांसाठी भाडेतत्त्वावर शेतजमीन देण्याचा प्रस्ताव दिला; मात्र जिल्हा परिषदेने तो नाकारल्याने जागाच शिल्लक राहिली नाही. त्यामुळे येथील शाळा नं. १च्या दुसरी व चौथीच्या मुलांना रयत इंग्लिश मीडियम स्कूलच्या व्हरांड्यात बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. तर, शाळा नं. २च्या तिसरी ब व क तुकडीच्या मुलींना कन्या विद्यालयाच्या प्रयोगशाळेत दाटीवाटीने बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. बाकी विद्यार्थ्यांची अवस्थाही काही प्रमाणात तशीच आहे. रयतने साडेसात ते साडेबारापर्यंत वर्गखोल्या वापरण्याची परवानगी दिली असली, तरी माध्यमिकची मुले लवकर येत असल्याने मुलांना ११ वाजताच वर्गातून बाहेर यावे लागते. त्यामुळे मुलांना अपेक्षित वेळ मिळत नाही. यामुळे शैक्षणिक दर्जा घसरू लागला आहे.
.......
ती इमारत रयतलाच हवीय
जिल्हा परिषदेने रयतकडे त्यांच्या आवारात तात्पुरत्या इराकॉन पॅनलच्या वर्गखोल्या बांधण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, रयतने त्या वर्गखोल्या तुमची गरज संपल्यानंतर आम्हाला सोडून जाणार असाल तर परवानगी देऊ, अशी अट घातल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. मात्र, जिल्हा परिषदेचा हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग असल्याने व पुढे गरज भासेल त्या ठिकाणी या खोल्या नेण्यात येणार असल्याचे प्रयोजन असल्याने तसे करता येणार नाही, असे जिल्हा परिषदेने म्हटले आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनीही रयतशी संपर्क साधला असता रयतच्या नीरा येथील स्थानिक स्कूल कमिटीनेच तसा प्रस्ताव दिला असल्याची माहिती रयतच्या सचिवांनी दिली आहे.
..........
ग्रामपंचायतीची बघ्याची भूमिका
दरम्यान, नीरा ग्रामपंचायतीने मात्र बघ्याची भूमिका घेतली आहे. पालक मुलांच्या बैठकव्यवस्थेबद्दल सांगत असताना काही सदस्य मात्र पुन्हा जुन्या इमारतीत शाळा भरवण्याचा सल्ला पालकांना देत आहेत. नीरा ग्रामपंचायतीमध्ये दोन गटांची सत्ता आहे. या दोन्ही गटांतील नेते पालकांना ‘आम्ही तुमच्याबरोबर असल्याचे’ सांगतात. मात्र, कोणताही तोडगा काढण्यास ते पुढे येत नाहीत. त्यामुळे पालकांमध्ये ग्रामपंचायत सदस्यांबाद्दल नाराजी पसरली आहे.
.........
शिक्षणाबाबत रयत शिक्षण संस्थेचे व्यावसायिक धोरण?
रयत संकुलात वापरात नसलेली मोठी जागा असताना रयतचे पदाधिकारी मुलांच्या शिक्षणासाठी तात्पुरती जागा उपलब्ध करून देतानाही आपल्या मोठ्या फायद्याचा विचार करताना दिसतायत आणि त्यातूनच रयतचे शिक्षणाचे धोरण व्यावसायिक झालेय का? असा सवाल उपस्थित होतो. नीरा येथे रयतच्या संकुलात आसपासच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी पाचवीपासून पुढे शिक्षण घेत आहेत. या भागातील प्राथमिक शाळा बंद पडून लोकांनी मुलांना इग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले, तर त्याचा फटका पुढील काळात रयतलाही बसेल.