शहरातील पुलांवरचे निर्माल्य कलश झाले गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 08:46 PM2018-10-19T20:46:22+5:302018-10-19T20:55:40+5:30
महापालिकेच्या वतीने दर वर्षी लाखो रुपये खर्च करून निर्माल्य कलश खरेदी केले जातात.परंतु सध्या सर्व कलश गायब झाले आहेत.
पुणे : पुण्याचे सौदर्य असलेल्या मुळा-मुठेचे प्रदुषण टाळण्यासाठी व आपले शहर ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ ठेवण्यासाठी नागरिकांनी निर्माल्य नदीत न टाकता शहरातील सर्व पुलांजवळ ठेवलेल्या निर्माल कलशात टाकण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने ठिक-ठिकाणी फलक लावून केले आहे. परंतु शहरातील पुलांवरील हे निर्माल्य कलश गायब झाल्याने नुकत्याच साजऱ्या झालेल्या दसऱ्यामुळे घराघरात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले निर्माल्य नागरिकांनी नदी न टाकता पुलांवरच टाकले आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे निर्माल्यपुलांवर पडून असून, महापालिकेच्या उदासिन प्रशासनामुळे ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ केवळ फलकांवर राहिले आहे.
शहरामध्ये नुकताच नऊ दिवसांचा नवरात्री उत्सव साजरा झाला. नवरात्रीनिमित्त शहरातील घराघरांमध्ये देवीचा घट बसविला जातो. या घटाला दररोज फुलांच्या माळा घातल्या जातात. दसऱ्याच्या दिवशी देवीच्या या घटाला दाखवून नैवद्य उठविला जातो. या घटामुळे व दस-या निमित्त देवाला, दाराला, गाड्यांना फुलांचे हार घातले जातात. यामुळे गणपती प्रमाणेच नवरात्रीत देखील घराघरांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माल्य निर्माण होते. निर्माल्य देवाचे असल्याने ते कच-यात न टाकता नदी टाकण्याची लोकांची धार्मिक भावना असते. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माल्य नदीत टाकल्यास नदीचे प्रदूषण होऊ शकते. हे टाळण्यासाठी महापालिका, विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून जनजागृती मोहीम राबवली. शाळा, महाविद्यालय, सोसायट्यांमध्ये कार्यक्रम घेऊन पुणेकरांनी निर्माल्य नदीत न टाकता शहराच्या विविध भागात, पुलांवर ठेवण्यात आलेल्या निर्माल्य कलशामध्ये टाकावे, असे आवाहन करण्यात आले. यामुळे पुणेकर नागरिक देखील सजग झाले असून, प्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्य कलश शोधत असतात. परंतु सध्या शहरातील सर्व पुलांवरील निर्माल्य कलश गायब झाले आहेत.
गणेशोत्सव, दसरा, दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण होणारे निर्माल्य नदीत टाकून नदीचे प्रदुषण होऊ नये म्हणून निर्माल्य कलशामध्ये टाकण्याचे आवाहन करणारे फलक सर्व पुलांवर लावण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने दर वर्षी लाखो रुपये खर्च करून निर्माल्य कलश खरेदी केले जातात.परंतु सध्या सर्व कलश गायब झाले आहेत. यामुळे शुक्रवारी (दि.१९) रोजी शहरातील सर्व पुलांवर निर्माल्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. नागरिकांनी निर्माल्य नदीत न टाकता पुलावर कलश असल्याचे फलक लावलेल्या ठिकाणी पिशव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हे निर्माल्य पुलांवरच टाकले आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांकडून या निर्माल्याच्या पिशव्या पुलांवर अस्ताव्यस्त झाल्या आहेत.हे चित्र शहरातील सर्व पुलांवर व कॅनॉलच्या लगत दिसत आहे.