निसर्ग चक्रीवादळात पिंपळोली गावात 146 घरांचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 10:38 PM2020-06-07T22:38:22+5:302020-06-07T22:50:17+5:30

विसापुर किल्ल्याच्या पुर्वेला वसलेल्या पिंपळोली गावातील तब्बल 146 घरांचे निसर्ग वादळात नुकसान झाले आहे. जन्मात कधी पाहिलं नाही असं हे वादळ आलं अनं क्षणात गावाचं होत्याचं नव्हतं करून गेलं.

Nisarg cyclone damages 146 houses in Pimpaloli village | निसर्ग चक्रीवादळात पिंपळोली गावात 146 घरांचे नुकसान 

निसर्ग चक्रीवादळात पिंपळोली गावात 146 घरांचे नुकसान 

Next

 - विशाल विकारी

लोणावळानिसर्ग चक्रीवादळाने घरं उडाली...चुली मोडल्या...धान्य भिजलं...होत्याचं नव्हतं झालं आता करायचं तरी काय अशी अवस्था पिंपळोली गावातील ग्रामस्तांची झाली आहे. विसापुर किल्ल्याच्या पुर्वेला वसलेल्या पिंपळोली गावातील तब्बल 146 घरांचे निसर्ग वादळात नुकसान झाले आहे. जन्मात कधी पाहिलं नाही असं हे वादळ आलं अनं क्षणात गावाचं होत्याचं नव्हतं करून गेलं अशी भावनिक प्रतिक्रिया गावातील ज्येष्ठ महिला व वादळात डोक्यावरील छतासह सर्व संसार उध्वस्त झालेल्या शैलाबाई गायकवाड यांनी दिली.

 बुधवारी मावळ परिसरात आलेल्या निसर्ग चक्री वादळाने लोणावळा परिसर‍ासह पाथरगाव जवळील पिंपळोली गावाचे फार मोठे नुकसान झाले आहे. गावातील 70 हून अधिक घरांचे पत्रे फुटले आहेत, दहा ते पंधरा घरांच्या भिंती पडल्या, जनावरांच्या जवळपास विस गोठ्यांचे शेड उडाले, जिल्हा परिषद शाळेला या वादळाचा फटका बसला. सोबतच वार्‍याने महावितरणचे 20 खांब पडले दोन ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाल्याने पाच दिवस संपुर्ण गाव अंधारात आहे. पुढिल किमान दहा दिवस गावात विज येण्याची शक्यता धुसर असल्याने या गावातील ग्रामस्तांवर कर्माला हात लावण्याची वेळ आली आहे.

      पावसाच्या सोबत ताशी 80 ते 120 किमी या वेगाने निसर्ग वादळ मावळात आल्याने डोंगरभागातील गावांना याचा मोठा फटका बसला. कागदांप्रमाणे घरांचे पत्रे व साहित्य काहीकाळ या वादळात हवेत उडत होते. वार्‍यांच्या वेगाने पत्रे उडाल्याने पावसाचे पाणी घरात साचले, पावसाकरिता घरात धान्याचा केलेला साठा यामध्ये भिजून गेला, घरातील सामान, कपडे व इतर वस्तूंची मोडतोड झाली. जनावरांच्या अंगावर पत्रे पडल्याने ती देखिल जखमी झाली, दुग्ध व्यावसायांना फटका बसला. डोक्यावर छतच नसल्याने झाकायचे तरी काय व पावसापासून घरातील साहित्य वाचवायचे कोणते अशा द्विधा मनस्थितीत नागरिकांनी स्वतःचे जीव वाचवित गावातील शाळा, मंदिरे याचा आधार घेतला. 

पिंपळोली गावच्या माजी सरंपच रेश्मा बोंबले, रामचंद्र पिंपळे, नंदा चौरे, पोलिस पाटील दिपाली बोंबले व ग्रामस्थ यांनी रस्त्यावर पडलेले मोठे वृक्ष बाजुला करुन गावाचा रस्ता मोकळा करून घेतला, कार्ला मंडल अधिकारी मानिक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गाव तलाठी कांबळे, ग्रामसेविका नूतन अमोलिक यांनी गावाचा पंचनामा करून वरिष्ठांकडे अहवाल सादर केला. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी काल या गावाला भेट देत गावाची पाहणी केली. त्यांच्या सोबत पुणे शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, अंकुश देशमूख हे देखिल होते. शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे आश्वासन बारणे यांनी ग्रामस्तांना दिले.  


 दागिने विकून आणले पत्रे - शैलाबाई गायकवाड (नुकसानग्रस्त) 

निसर्ग चक्रीवादळाने घराचे सर्व पत्रे उडाले, सगळा संसार उघडा पडला, धान्य भिंजले, भांडी चेंबली अशा अवस्थेत घराला पुन्हा छत घालण्यासाठी जवळ पैसे नसल्याने गळ्यातील सोन्यांचे दागिणे मोडून पत्रे आणायची वेळ या वादळाने आणली, आम्हाला शासनाने काहीतरी मदत करावी अशी भावनिक हाक या गावातील ज्येष्ठ महिला शैलाबाई गायकवाड यांनी दिली आहे.

 वादळाने पिंपळोली गावाला आस्मान दाखविले - सुनिल गुजर ( नुकसानग्रस्त) 

निसर्ग वादळाने पिंपळोली गावाला थेट आस्मान दाखविले. गावातील बहुतांश घरांचे पत्रे उडाल्याने सर्वजण उघड्यावर आले आहेत. गावात लाईट नसल्याने नविन पत्रे टाकण्याकरिता व मोडलेल्या लोखंडी शेडची दुरुस्ती करता येत नसल्याने मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. दुकानदारांनी पत्र्यांचे भाव देखिल वाढविले आहे, सर्वसामान्य नागरिकांनी या संकटातून उभे रहायचे कसे व जगायचे कसे.

Web Title: Nisarg cyclone damages 146 houses in Pimpaloli village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.