निसर्गतत्त्व हा टागोरांच्या साहित्याचा आत्मा : डॉ. माधवी भट; पुण्यात का. र. मित्र व्याख्यानमाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:50 AM2017-12-22T11:50:15+5:302017-12-22T11:55:43+5:30
निसर्गतत्त्व हा टागोरांच्या साहित्याचा आत्मा आहे’, असे मत बंगाली साहित्याच्या अभ्यासक डॉ. माधवी भट यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित मासिक मनोरंजनकार का. र. मित्र व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या.
पुणे : ‘अजाणत्या वयापासून वाट्याला आलेले एकटेपण आणि जवळच्या व्यक्तींचे मृत्यू यामुळे निसर्ग हाच रवींद्रनाथ टागोरांचा जवळचा मित्र बनला. हाच निसर्ग त्यांच्या समग्र साहित्यात भरून उरला आहे. निसर्गतत्त्व हा टागोरांच्या साहित्याचा आत्मा आहे’, असे मत बंगाली साहित्याच्या अभ्यासक डॉ. माधवी भट यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित मासिक मनोरंजनकार का. र. मित्र व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. ‘रवींद्रनाथांचे कथाविश्व’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे उपस्थित होते.
भट म्हणाल्या, ‘माणूस आणि त्याचे मन हा टागोरांच्या कथांचा केंद्रबिंदू आहे. त्यांच्या कथेतील स्त्री प्रतिमा अभिसारिकेच्या रूपात नाही. ती आत्ममग्न सखीच्या रूपात आहे. पुरुषप्रतिमा प्रेमळ आईसारखी आहे. गंभीरविषय कथांमध्ये हाताळताना टागोरांमधला विनोदकार ठळकपणे दिसतो. उपहासाचा प्रभावीपणे वापर त्यांच्या कथांमध्ये आहे. भारतातली जमिनदारी व्यवस्था त्यातून निर्माण झालेली शोषणव्यवस्था आणि त्यात पिचणारी माणसं याच ही प्रभावी चित्रण टागोरांच्या कथांमध्ये आहे. देशभक्त, तत्वज्ञ, समाजसुधारक अशी त्यांची विविध रूपे त्यांच्या साहित्यात दिसतात. मराठी भाषा आणि बंगाली भाषा या मावसबहिणीप्रमाणे आहेत. अभिव्यक्तीतले साम्य महाराष्ट्र आणि बंगाल या दोन्ही प्रांतात आढळते.’
प्रा. जोशी म्हणाले, ‘सर्जनाच्या ज्या ज्या प्रांतात टागोर रमले, तो प्रांत आपल्या प्रतिभासामथ्यार्ने त्यांनी उजळून टाकला. शांतिनिकेतन, श्री निकेतन आणि विश्वभारती सारख्या संस्था त्यांच्या सर्जनशीलतेचे आणि कल्पकतेचे दर्शन घडवितात. मानव्य हा निर्मितीचा कळस आहे, असे मानणारे टागोर थोर साहित्यकार आणि दार्शनिक होते.’ दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.