बादशाह शेखसह त्यांच्या साथीदाराला अटक करा- नितेश राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 09:54 PM2022-11-17T21:54:50+5:302022-11-17T21:55:02+5:30
बादशाह शेख आणि त्यांच्या साथीदाराला ४८ तासांच्या अटक करण्याची मागणी...
दौंड (पुणे) : येथील एका तरुणीचा विनयभंग करून तिच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे बादशाह शेख आणि त्यांच्या साथीदाराला ४८ तासांच्या अटक करा अन्यथा पुढील पवित्रा उचलायला लावू नका, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी पोलिसांना जाहीर सभेतून दिला.
दौंड येथे हिंदू जन आक्रोश ठिय्या आंदोलनाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी डोक्यावर भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या तर हातात भगवे ध्वज घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा कार्यकर्ते देत होते. यावेळी जाहीर भाषणात नितेश राणे म्हणाले की, बादशाह शेख आणि त्यांच्या कार्यकर्त्यावर विनयभंग, मारहाण आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवून दहा दिवस झाले, मात्र अद्याप आरोपींना अटक नाही. नेमके आरोपी कुठे आहेत हे पोलिसांना माहिती असून पोलीस आरोपींना पकडत का नाहीत. सध्याचे महाराष्ट्रातील सरकार शिंदे आणि फडणवीस यांचे हिंदुत्ववादी सरकार आहे. दरम्यान, हिंदुत्ववादी सरकार कुणाचाही अन्याय, अत्याचार सहन करून घेणार नाही. परिणामी येथून पुढे जशास तसे उत्तर दिले जाईल, असे राणे यांनी स्पष्ट केले.
जाहीर सभेच्या पूर्वी नितेश राणे पोलीस स्टेशनच्या परिसरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत दौंड शहर दहशतीच्या खाली आहे, परंतु सध्या राज्यात सरकार कोणाचे आहे याचा विचार बादशाह शेख यांनी करावा. मी आज फक्त आंदोलनासाठी आलो नाही तर दौंड शहरावर येथून पुढे ज्या ज्या वेळेस अडचणी येतील त्या त्या वेळेस मी दौंडला येईन. पोलिसांनी बादशाह शेख यांना पाठीशी घालायचा प्रयत्न केला तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते आहे. तेव्हा हा सर्व प्रकार त्यांच्या कानावर घालावा लागेल. हिंदू-मुस्लीम यांच्यात तेढ निर्माण होऊ नये तसेच कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये या मताचा मी आहे. मात्र दौंडमध्ये हिंदू तरुणीचा विनयभंग करून तिच्या कुटुंबीयांना मारहाण केली जाते, असा अन्याय कुठपर्यंत सहन करायचा? झालेल्या अन्यायाची सीआयडीमार्फत चौकशी केली जावी, असे शेवटी राणे म्हणाले. आंदोलनापूर्वी नीलेश राणे यांनी पीडित तरुणीसह त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेतली.