प्रतिकूलतेला अनुकूल कसे बनवावे, हे छत्रपती संभाजी राजांकडून शिकावे : नितीन बानगुडे पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 04:21 PM2017-12-27T16:21:37+5:302017-12-27T16:26:44+5:30
आपला वर्तमान व भविष्यकाळही उज्ज्वल करता आला पाहिजे, असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले. 'आम्ही मुळशीकर प्रतिष्ठान'च्या स्नेहमेळाव्यात पाटील बोलत होते.
पुणे : शिवरायांकडून कसे जगावे हे शिकावे, तर संभाजी राजांकडून कसे मरावे हे शिकावे. प्रतिकूल परिस्थिती अनुकूल कशी करावी हे छत्रपती संभाजी राजांचे चरित्र अभ्यासले की लक्षात येते. आपला इतिहास उज्ज्वल आहे. तसाच आपला वर्तमान व भविष्यकाळही उज्ज्वल करता आला पाहिजे, असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले.
'आम्ही मुळशीकर प्रतिष्ठान'च्या वतीने दहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात प्रा. बानगुडे-पाटील बोलत होते. यावेळी पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांना मुळशी गौरव पुरस्कार २०१७ या पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी आम्ही मुळशीकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. गणेश सातपुते, पोलीस क्षेत्रात राष्ट्रपती पदक मिळविलेले कैलास मोहोळ, महेंद्र राजभोज, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा तिसरा विजेता मुन्ना झुंझर्के, कुस्तीपटू शंकर कंधारे, प्रमोद मांडेकर, विधितज्ज्ञ राम धुमाळ, विकास ढोक, निवृत्ती येवले, मनोज फाटक, माऊली डफळ, राम गायकवाड, सिताराम धोंडे-पाटील, लक्ष्मण कंधारे, उमेश सातपुते आणि मुळशीकर प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी गुरुकुल संकुल उभारणारे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटु शंकर कंदारे, अत्याधुनिक पद्धतीने शेती करणारे प्रमोद मांडेकर, पोलीस क्षेत्रात राष्ट्रपती पदक मिळविलेले कैलास मोहोळ, आठवीमध्ये शिकत असलेला जलतरण स्पर्धेमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ५० पारितोषिकांचा मानकरी नतीश कुडले, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा तिसरा विजेता मुन्ना झुंझुर्के यांना विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गेल्या दहा वर्षांपासून वर्धापदिन साजरा करत असलेल्या मुळशीकर परिवाराचे ग्रामीण भागातील लोकांना एकत्रित आणून त्यांचा विकास करणे हे वैशिष्ट्यपूर्ण काम आहे. पुणे जिल्ह्यातील काश्मीर म्हणून ओळखले जाणारे मुळशी आहे. अशा शब्दात मुळशीचे वर्णन करत प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी आपल्या मातीतल्या माणसांचा सन्मान केला.
मुळशीचा विकास करणे, हेच आपले ध्येय असल्याचे आम्ही मुळशीकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. गणेश सातपुते यांनी यावेळी सांगितले.