Nitin Gadkari :येत्या काही महिन्यात इथेनॉलवर धावणार कार अन्  दुचाकी; नितीन गडकरी यांचं मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 02:00 PM2024-11-27T14:00:23+5:302024-11-27T14:00:59+5:30

इंधनाचा वापर करून तयार केलेली वाहने बाजारात आणणार आहेत, असे केंद्रीय रस्तेवाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

Nitin Gadkari | Nitin Gadkari :येत्या काही महिन्यात इथेनॉलवर धावणार कार अन्  दुचाकी; नितीन गडकरी यांचं मोठे वक्तव्य

Nitin Gadkari :येत्या काही महिन्यात इथेनॉलवर धावणार कार अन्  दुचाकी; नितीन गडकरी यांचं मोठे वक्तव्य

पुणे : इथेनॉलपासून विमानाला लागणारे इंधन तयार करण्यास आता सुरुवात झाली असून, येत्या पाच महिन्यांत चारचाकी तयार करणाऱ्या विविध कंपन्या १०० टक्के बायो इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या बाजारात आणणार आहेत, त्याबरोबरच दुचाकी तयार करणाऱ्या कंपन्यादेखील त्याच इंधनाचा वापर करून तयार केलेली वाहने बाजारात आणणार आहेत, असे केंद्रीय रस्तेवाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

पुण्यातील एका कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेत गडकरी बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शां. ब. मुजुमदार, फोर्स मोटरचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया, पर्सिस्टंटचे अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे, प्राज इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक शिशिर जोशीपुरा, प्राजच्या बायोएनर्जी बिझनेसचे अध्यक्ष अतुल मुळे उपस्थित होते.

भारताचे ‘इथेनॉल मॅन’ अशी ओळख असलेले ज्येष्ठ उद्योजक व प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना, पाटेठाण यांच्या वतीने डॉ. चौधरी यांचा सन्मान करण्यात आला.

नितीन गडकरी म्हणाले, ‘गेल्या वर्षी मक्याला १२०० रुपये क्विंटलचा भाव होता; पण त्याच्यापासून इथेनॉल तयार करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे त्याच्या भावात आता थेट दुपटीने वाढ झाली आहे.’ वेगवेगळ्या धान्यापासून इथेनॉल तयार करण्याची प्रक्रिया गतिमान होऊ लागल्यामुळे देशातील शेतीच्या विकासाचा दर १८ ते २० टक्क्यांपर्यंत जाईल. आपल्याकडे अर्थशास्त्र आणि पर्यावरण हे दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत. हवेत होणाऱ्या प्रदूषणातील ४० टक्के प्रमाण हे वाहनांमुळे होत असल्याने इंधनाला वेगवेगळे पर्याय निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

पेट्रोलबरोबरच डिझेलमध्येदेखील १५ टक्के इथेनॉल टाकण्याच्या संदर्भातील प्रस्ताव एआरएआय या संस्थेकडे असल्याचेही गडकरी यांनी नमूद केले. डॉ. रघुनाथ माशेलकर यांनीही मनोगत व्यक्त केले. शिशिर जोशीपुरा यांनी प्रास्ताविक केले, तर अतुल मुळे यांनी आभार मानले. चैतन्य राठी यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.