व्यथेची झाली कथा, गडकरी आले घरा; नितीन गडकरींचा मेधा कुलकर्णींना दिलासा
By राजू इनामदार | Published: August 12, 2023 08:49 PM2023-08-12T20:49:52+5:302023-08-12T20:50:24+5:30
चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घघाटनाआधी डॉ. कुलकर्णी यांनी या पुलाच्या कामात आपला आमदार म्हणून मोठा सहभाग असतानाही डावलले जात असल्याची खंत समाजमाध्यमांवर जाहीरपणे व्यक्त केली होती.
पुणे : तब्बल ५ वर्षांनी कोथरूडच्या माजी आमदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी त्यांना डावलेले जात असल्याच्या व्यथेला जाहीर वाचा फोडली, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याची दखल घेत थेट त्यांच्या निवासस्थानाला भेट दिली व त्यांच्या व्यथेची रम्य कथा केली. दिल्लीत बोलतो असा दिलासाही त्यांनी डॉ. कुलकर्णी यांना दिला.
चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घघाटनाआधी डॉ. कुलकर्णी यांनी या पुलाच्या कामात आपला आमदार म्हणून मोठा सहभाग असतानाही डावलले जात असल्याची खंत समाजमाध्यमांवर जाहीरपणे व्यक्त केली होती. खुद्द गडकरी यांनीही याच पूलाच्या भूमीपूजन कार्यक्रमात त्यावेळी आमदार असलेल्या डॉ. कुलकर्णी यांचा गौरवपूर्वक उल्लेख करत त्यांनी पाठपुरावा केल्यामुळेच आपण या पुलासाठी खात्याकडून निधी मंजूर केला असल्याचे म्हटले होते. त्याचाच उल्लेख करत डॉ. कुलकर्णी यांनी त्यावेळी या सर्व कामात जे नव्हते ते आज सर्व काम आपणच केले असे भासवत आहेत. मात्र त्यातून मला जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचे आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.
गडकरी यांनी याची दखल घेतली. उड्डाणपूलाच्या कार्यक्रमात त्यांनी डॉ. कुलकर्णी यांना पहिल्या रांगेत स्थान दिलेच, त्याशिवाय कार्यक्रमानंतर लगेचच ते थेट डॉ. कुलकर्णी यांच्या घरी गेले. तिथे ते तब्बल अर्धा तास होते. डॉ. कुलकर्णी यांचे पती विश्राम, कन्या कल्याणी, जावई कौशिक, व्याही सरदेसाई व परिवारातील अन्य सदस्यांबरोबर त्यांनी गप्पा मारल्या. वास्तूविशारद असलेल्या कल्याणी यांना त्यांनी काम कुठे सुरू आहे वगैरे विचारणा केली. डॉ. कुलकर्णी यांचे एक स्नेही ठाकूर यांनी इलेक्ट्रिक कारचे एक डिझाईन तयार केले आहे. ते त्यांना गडकरी यांना दाखवायचे होते. त्याचीही माहिती गडकरी यांनी घेतली.
तुमचे म्हणणे बरोबर आहे. मी दिल्लीत याविषयी बोलतो. तुम्हीही दिल्लीत या. वेळ व तारीख कळवतो असा दिलासाही त्यांनी डॉ. कुलकर्णी यांना दिला. भेळ, पाणीपूरी, आळूची वडी या खाद्यपदार्थांचा गडकरी यांनी निवांत आस्वाद घेतला व त्यानंतर ते तिथून पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले की गडकरी यांचे आदरातिथ्य करायचा मिळाले याचा आनंद आहे. त्यांनी आपल्या राजकीय भावना समजून घेतल्या याचे समाधान आहे.
कोथरूडच्या सिटिंग आमदार असलेल्या डॉ. कुलकर्णी यांना थांबवून भाजपने तिथे कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली. त्याबद्दलची खंत डॉ. कुलकर्णी यांनी कधीही जाहीरपणे व्यक्त केली नाही. त्यावेळी त्यांना विधानपरिषदेवर घेण्याचा शब्द देण्यात आला. तो तर पाळला गेला नाही. त्यानंतर त्यांना पुण्यातील सगळ्याच मोठ्या कार्यक्रमांमधून त्यांना डावलले जाऊ लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुण्यातील कार्यक्रमात त्यांना व्हीआयपी पासही दिले गेले नाही. 'मी राष्ट्रीय महिला मोर्चाची राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे' असे सांगितल्यानंतरही पास दिला गेला नाही. याविषयी त्यांनी समाजमाध्यमांमध्ये लिहिले होते.